India Prepares For MPOX : रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड, एअरपोर्टवर अलर्ट; Mpox ला सीमांवरच थोपवण्यासाठी केंद्र सरकार कितपत तयार?
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
India Prepares For MPOX : नवी दिल्ली : जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तर आता जगभरात मंकीपॉक्सनं डोकं वर काढलं आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सनं धुमाकूळ घातला आहे. अशातच आता हा मंकीपॉक्स कोरोनाप्रमाणेच हातपाय पसरणार की, काय? अशी भितीच व्यक्त होत आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अशातच केंद्र सरकारनंही या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्सला (MPOX) जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती पाहता आपत्कालीन वॉर्ड तयार केले जात आहेत आणि विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रुग्णालयांना निर्देश
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून रुग्णालयांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांच्या शरीरावर पुरळ उठले आहेत, अशा रुग्णांची ओळख पटवून आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे निर्देश सरकारनं रुग्णालयांना दिले आहेत. दिल्लीतील तीन प्रमुख रुग्णालये - सफदरजंग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयांना हे निर्देश देण्यात आले आहेत.
विमानतळांवरही अलर्ट
संशयित रुग्णांवर RT-PCR आणि नाकातील स्वॅब चाचण्या केल्या जातील. विमानतळांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेनं MPOX ला दुसऱ्यांदा जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे. व्हायरसचा एक नवा प्रकार उदयास आला आहे, जो मागीलपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि लैंगिक संपर्कासह, नियमित जवळच्या संपर्काद्वारे सहजपणे पसरत असल्याचं दिसतंय.
भारतात नव्या व्हेरियंटची प्रकरणं नाहीत
भारतात आतापर्यंत MPox च्या नव्या स्ट्रेनचं कोणतंही प्रकरण नोंदवलं गेलेलं नाही. परंतु 16 ऑगस्ट रोजी, पाकिस्तानमध्ये तीन MPOX प्रकरण नोंदवलं गेलं, जी संयुक्त अरब अमिरातीतून आली होती. यापूर्वी स्वीडनमध्ये आफ्रिकेबाहेर एमपॉक्सची पहिली केस नोंदवण्यात आली होती.
राज्य सरकारही अलर्ट मोडवर
मंकीपॉक्ससंदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
- ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं/बंदरं आहेत, तेथील आरोग्य विभागानं आंतरराष्ट्रीय/बंदरे आरोग्य अधिकारी यांच्याशी नियमित समन्वय ठेवावा.
- मंकीपॉक्ससंदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्व्हेक्षण सुरु आहे याची खातरजमा करुन संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी
- मंकीपॉक्स हा सौम्य स्वरुपाचा आजार असून रुग्ण 2 ते 4 आठवड्यात बरा होतो. तथापि लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरुप धारण करु शकतो. ह्या आजाराचा मृत्यूदर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे.
- मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक. स्वतंत्र्य व्हेंटिलेशनची व्यवस्था असावी.
- रुग्णाने ट्रीपल लेयर मास्क लावणे आवश्यक
- रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्ण झाकलेली असावीत, त्याने लांब बाह्यांचे शर्ट आणि पॅन्ट वापरावी
- रुग्णाच्या कातडीवरील फोड/पुरळ पूर्ण बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे
- रुग्णाला लक्षणानुसार उपचार द्यावे, पाण्याचे प्रमाण घेईल याची दक्षता घ्यावी
- मंकीपॉक्स न होण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी देखील मार्गदर्शक सूचना जाहीर
- आरोग्य संस्थामध्ये मंकीपाॅक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करावा