India Pakistan War: भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला, एकापाठोपाठ स्फोटांचे आवाज
India Pakistan War: भारतीय सैन्याने पाकिस्तानने डागलेली 50 क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केली आहेत. भारताच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला

India attack on Karachi Port: पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी संध्याकाळी भारतावर हल्ला केल्यानंतर युद्धाला तोंड फुटले आहे. साधारण रात्री 9 वाजता पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थान परिसरात ड्रोन आणि रॉकेटच्या साहाय्याने हल्ला चढवला. याशिवाय पाकिस्तानकडून भारतावर अगणित क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. मात्र, भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. त्यानंतर आता भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानवर प्रतिहल्ला सुरु केला आहे. एकीकडे भारतीय वायूदल आणि दुसरीकडे भारतीय नौदल अशी दुहेरी आघाडी भारतीय सैन्याने उघडली आहे. भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला चढवला आहे.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय नौदलाचे वेस्टर्न नेव्हल कमांड सक्रिय झाले होते. पाकिस्तानच्या कराची बंदराच्या परिसरात INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौका तैनात होत्या. या दोन्ही युद्धनौकांनी आता कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. कराची बंदरावर जवळपास 10 स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे आता भारतीय नौदल कराची बंदर उद्ध्वस्त करणार का, हे बघावे लागेल.
भारतीय वायूदलाचा पाकिस्तानच्या राजधानीवर हल्ला, स्फोटांचे आवाज
पाकिस्तानचा हवाई हल्ला परतावून लावल्यानंतर भारतीय वायूदलाच्या विमानांनी आता पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर हल्ला चढवला आहे. पाकिस्तानमधील लाहोर, इस्लामाबाद, बहावलपूर या शहरांवर भारतीय सैन्याने हवाई हल्ले चढवले आहेत. सध्या इस्लामाबादमध्ये एकापाठोपाठ स्फोटाचे आवाज सुरु आहेत. ही पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की ठरली आहे. तर सीमारेषेवरही भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून एकमेकांवर जोरदार गोळीबार सुरु आहे. काहीवेळापूर्वीच पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतावर हल्ला केला होता. मात्र, भारताच्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माऱ्यात पाकिस्तानची 2 एफ 16 आणि दोन जेएफ 17 विमाने पाडली आहेत. यापैकी दोन विमानांतील पाकिस्तानी वैमानिक भारताच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, याबद्दल भारतीय सैन्याने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय सैन्याने पाकिस्ताने डागलेली 50 क्षेपणास्त्रे पाडल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
भारताने पाकड्यांचं इगल AWACS विमान पाडलं, हल्ल्याचा कंट्रोलच गमावला, एफ 16, जेएफ 17 विमानंही पाडली























