ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था रामभरोसे! डॉक्टर, नर्सेसच्या अनेक जागा रिक्त
India Rural Health Care : देशातील ग्रामीण आरोग्य भागात डॉक्टर, नर्सेससह इतर अनेक जागां रिक्त आहेत. याच्या परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.
India Rural Health Care : भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्य करते असे म्हटले जाते. कोरोना महासाथीच्या काळात या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्यात. देशातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीच्या घोषणा होत असल्या तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून भारताने ग्रामीण आरोग्य सेवा केंद्रांमध्ये रिक्त पदे भरलेली नाहीत. प्रत्येक ग्रामीण आरोग्य क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी 2021 च्या ताज्या अहवालानुसार, दीड दशकांपूर्वीच्या तुलनेत ग्रामीण आरोग्यासाठी मनुष्यबळाची गरज आणखी वाढली आहे.
ग्रामीण भागात 68 टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. सन 2005 पासून आतापर्यंत रिक्त पदात 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रात सर्जन,फिजिशियन, बालरोगतज्ञ तसेच प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ या तज्ज्ञांच्या जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागात 9000 तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.
ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष 2005 मध्ये 7582 पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 3550 जागा भरण्यात आल्यात. तर, 4032 जागा रिक्त होत्या. तर, 2021 मध्ये 13637 पदांवर भरतीसाठी मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 4405 जागा भरण्यात आल्यात. तर 9232 जागा रिक्त आहेत. याचाच अर्थ जवळपास 68 टक्के जागा आहेत.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या रिक्त पदात वाढ झाली आहे. सन 2005 मध्ये 17 टक्के जागा रिक्त होत्या. तर 2021 मध्ये हे प्रमाण 21 टक्के झाले आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसाठी वर्ष 2005 मध्ये 24,476 पदे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 20,308 जागा भरण्यात आल्यात. तर 2021 मध्ये 40,143 जागा मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी 31,716 जागांवर डॉक्टरांची भरती करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका, मदतनीसांच्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2005 मध्ये 1,39,798 पदांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 1,33,194 जागांवर भरती करण्यात आली. 2021 मध्ये 2,68,913 पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 2,14,820 जागांवर भरती करण्यात आली आहे. 54,093 जागा रिक्त आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात परिचारिका पदासाठीही अनेक जागा रिक्त आहेत. सन 2005 मध्ये 34,061 जागांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 5,131 जागा रिक्त राहिल्यात. तर 2021 मध्ये 1,06,725 जागांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 27,681 हजार जागा रिक्त आहेत.