Covid-19 Vaccine Shortage : देशात आणखी 2-3 महिने लसींचा तुटवडा जाणवेल : अदर पुनावाला
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासन आग्रही दिसत आहे, पण...
Covid-19 Vaccine Shortage : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय प्रशासन आग्रही दिसत आहे. किंबहुना त्यासाठी पावलंही उचलण्यात येत आहेत. असं असतानाच आता देशात लसींचा मात्र तुटवडा जाणवू लागला आहे. देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मात्र हा पुरवठाही पूरेसा नाही हेच चित्र स्पष्ट होत आहे. याचदरम्यान, कोवीशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी येत्या 2- 3 महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा अशाच पद्धतीनं जाणवत राहिल असं सूचक वक्तव्य केलं आहे.
सध्याच्या घडीला एका दिवसाला 6- 7 कोटी लसींच्या निर्मितीचा आकडा जुलै महिन्यातच 10 कोटींवर पोहोचू शकेल अशी वस्तूस्थितीही त्यांनी मांडली. मागणी कमी असल्यामुळं याआधी कंपनीनं लसींचं प्रमाण वाढवलं नवंहतं. ज्यामुळंच जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हं आहेत.
'लसीला पुढे मागणी नव्हती. आम्ही विचारही केला नव्हता की एका वर्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करावी लागेल', लंडनमधील Financial Times ला दिलेल्या मुलाखतीत पुनावालांनी हे वक्तव्य केलं.
संबंधित यंत्रणेला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर जानेवारी महिन्यापासून अपेक्षितच नव्हता. सर्वांना खरंच वाटत होतं की कोविडच्या संकटाला आपण थोपवू लागलो आहोत, असंही ते या मुलाखतीत म्हणाले. मागील महिन्यात शासनानं सिरमला 3 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली होती. 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच्या लसींच्या उत्पादनासाठीही ही तरतूद होती, ही महत्त्वाची माहिती पुनावाला यांनी दिली.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर
भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दर दिवशी 3 लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची भर देशाच्या रुग्णसंख्येत पडत आहे. ज्यामुळं याचा थेट ताण देशातील आरोग्य यंत्रणांवर आणि वैद्यकिय सुविधांवर येत आहे. कोरोनाचा हाच फोफावणारा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून देशात विविध टप्प्यांमध्ये लसीकण मोहिम हाती घेण्यात आली. ज्यामध्ये आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा समोर उभा ठाकला आहे. बहुतांश भागांमध्ये या लसीकरण मोहिमेस सुरुवातही झाली आहे. पण, लसींच्या तुटवड्यामुळं या मोहिमेत मात्र अनेक अडथळे येत आहेत ही परिस्थिती नाकारता येत नाही.