India’s best cartoonists : व्यंगचित्रातून देशातील परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार! जाणून घ्या त्यांच्याबद्दल...
India’s best cartoonists : एका व्यंगचित्राच्या माध्यमातून अतिशय मार्मिकपणे समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्याचे काम आपल्या देशातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केले. अशाच काही व्यंगचित्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया...
![India’s best cartoonists : व्यंगचित्रातून देशातील परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार! जाणून घ्या त्यांच्याबद्दल... Independence Day 2022 Special Indias famous cartoonist who made poignant comments on the situation in the country through cartoons India’s best cartoonists : व्यंगचित्रातून देशातील परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार! जाणून घ्या त्यांच्याबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/239157a48dcd147c7458d3a2dd3c4b801659856213_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India’s best cartoonists : भारत देश म्हणजे कलासंपन्न देश! विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. असं म्हणतात हजार शब्द जे व्यक्त करू करू शकत नाही, ते चित्र सांगून जाते. यातही जर ते व्यंगचित्र असेल, तर मात्र ते खूप काही सांगून जाते. आदिमानव काळापासून चित्रांद्वारे व्यक्त होण्याची संकल्पना सुरु झाली आहे. प्राचीन खडकांवर, लेण्यांमध्ये असलेले पाषाणयुगातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचे चित्ररूपातील वर्णन आणि आताचे व्यंगचित्र यांच्यात निश्चितच साम्य आढळते. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून अतिशय मार्मिकपणे समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्याचे काम आपल्या देशातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केले. अशाच काही व्यंगचित्रकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...
आर. के. लक्ष्मण
व्यंगचित्र म्हटलं की, पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आर. के. लक्ष्मण. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण हे त्यांचे संपूर्ण नाव. व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला ‘कॉमन मॅन’ घराघरांत पोहोचला. लक्ष्मण यांनी स्थानिक वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून समाजातील सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या. आर. के. लक्ष्मण यांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होत.
अबू अब्राहम
भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार संपुष्टात आले होते. अनेक राजकारण्यांना तुरुंगात टाकले गेले होते. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली होती. सगळ्यावर निर्बंध असतानाही त्या काळात काही व्यंगचित्रकार थांबले नाहीत. यापैकीच एक व्यंगचित्रकार होते अबू अब्राहम. अबू अब्राहम यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून इंदिरा गांधी आणि त्यांच्या हुकूमशाहीवर घणाघाती हल्लाबोल केला होता. आजही त्यांच्या व्यंगचित्रातून आणीबाणी चांगल्या प्रकारे समजून घेता येते.
मारिओ मिरांडा
गोवा म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ते नारळाच्या झाडाखाली गिटार घेऊन आनंदाने गाणे गात असलेल्या गोवन व्यक्तीचे कार्टून स्वरूपातील चित्र. हे चित्र रेखाटले होते व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी. त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून गोवन जीवनशैली रेखाटली. आश्चर्य म्हणजे ते स्वतः गोव्याचे नव्हते. त्यांचा जन्म दमणमध्ये झाला होता. त्यांचे वडील गोव्याचे असल्याने त्यांना गोव्याविषयी विशेष प्रेम होते. त्यांनी वृत्तपत्रांमधून रेखाटलेली व्यंगचित्रे वाचकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
के. शंकर पिल्लई
के शंकर पिल्लई यांना भारतीय व्यंगचित्रकारांचे जनक म्हटले जाते. के शंकर पिल्लई हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आवडत्या चित्रकारांपैकी एक होते. 1930-40च्या काळात त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजपरिस्थितीवर भाष्य करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वृत्तपत्रातून व्यंगचित्र रेखाटणाऱ्या के. शंकर पिल्लई यांनी 1946मध्ये ‘शंकर्स विकली’ नावाने स्वतःचे साप्ताहिक सुरु केले. त्यांना त्यांच्या या अमुल्य योगदानाबद्दल ‘पद्मविभूषण’ आणि ‘पद्मभूषण’सह अनेक मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
बाळासाहेब ठाकरे
शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. कुशल राजकारणी असणारे बाळासाहेब उत्तम व्यंगचित्रकारही होते. बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आजही लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रामधील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांची मुख्य भूमिका होती. एक कलाकार, व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या व्यंगचित्रांमधून त्यांनी अतिशय ज्वलंत विषयांवर देखील मार्मिकपणे भाष्य केले. घटना-प्रसंगांतील विसंगती, व्यंगचित्रांचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने रेखाटलेली त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली. व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी त्यांनी ‘मार्मिक’ या साप्ताहिकाची स्थापना केली.
शि. द. फडणीस
प्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांना भरपूर हसवले. हंस-मोहिनी मासिकांची मुखपृष्ठे देखील त्यांनीच रेखाटली होती. शि.द. फडणीस यांचे नाव हास्यचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. सहज, साध्या सोप्या शैलीतली त्यांची शब्दविरहित चित्रे भाषा, प्रांत, धर्म, वर्ग या सगळ्यांचा सीमा ओलांडतात. त्यांच्या व्यंगचित्रांवर आधारित हसरी गॅलरी (Laughing Gallery) हे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्यांचे हे पुस्तक आजही लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या क्षेत्रातील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
सुधीर तैलंग
व्यंगचित्रकार सुधीर तैलंग यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून नेहमीच सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या. त्यांना सामान्य माणसाच्या गरजा, त्यांच्या समस्या आणि त्यांचे मत यांची जाण होती. त्यांनी नेहमी आपल्या व्यंगचित्रांच्या केंद्रस्थानी सामान्य माणसाला ठेवले. त्यांनी नेहमीच आपल्या चित्रांमधून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. सुधीर तैलंग यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, पीव्ही नरसिंह राव, मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकारण्यांची व्यंगचित्रे रेखाटली होती. सुधीर तैलंग यांचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित व्यंगचित्रांची मालिका असलेले 'नो, प्राइम मिनिस्टर' नावाचे व्यंगचित्रांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)