(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IAS Pooja Singhal : आयएएस पूजा सिंघल EDच्या रडारवर; नोटांचं घबाड पाहून अधिकारीही चक्रावले
IAS Pooja Singhal : झारखंडमध्ये अवैध उत्खनन प्रकरणी खाण सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या वीस ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली.
IAS Pooja Singhal : झारखंडमध्ये आयएएस अधिकारी पूजा सिंघल ईडीच्या रडारवर आहेत. अवैध उत्खनन प्रकरणी खाण सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या वीस ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. रांची, धनबाद यासह विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत तब्बल 18 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांचं घबाड पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावलेत.
अवैध उत्खनन प्रकरणी शुक्रवारी सकाळपासून आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्यासह त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या 20 ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. सिंघल यांच्या सीएच्या घरुन 17 कोटींची कॅश आणि 8 कोटींची बाकीची मालमत्ता जप्त केली आहे. अधिकाऱ्यांनी हे सर्व पैसे बॉक्समध्ये भरले आणि बसमध्ये घेऊन गेले. या कारवाईबाबत अद्याप पूजा सिंघल यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अद्याप सिंघल यांच्याकडून मिळालेल्या रकमेबद्दलची अधिकृत माहिती ईडीकडून देण्यात आलेली नाही. पूजा सिंघल यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रं मिळाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या पथकांकडून रांचीच्या कांके रोड, चांदनी चौक परिसरातील पंचवटी रेसिडेन्सीच्या ब्लॉक क्रमांक 9, लालपूरच्या हरिओम टॉवर , बरियातूमधील पल्स रुग्णालयात छापा मारला. पल्स रुग्णालय पूजा सिंघल यांचे पती आणि व्यवसायिक अभिषेक झा यांचं आहे.
कोण आहेत पूजा सिंघल
पूजा सिंघल झारखंडच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे उद्योग सचिव आणि खाण सचिव पदाचा प्रभार आहे. पूजा यांच्याकडे झारखंड राज्य खनिज विकास निगमच्या चेअरमन पदाची देखील जबाबदारी आहे. राज्यात भाजपचं सरकार असताना त्या कृषी सचिव पदावर कार्यरत होत्या. खुंटी जिल्ह्यात 18.06 कोटींचा मनरेगा घोटाळा उघडकीस आला, त्यावेळी त्या उपायुक्त पदावर तैनात होत्या.
सत्ताधाऱ्यांनी केलं कारवाईचं स्वागत
राज्यातील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ति मोर्चानं ईडीच्या या कारवाईचं स्वागत केलं आहे. मोर्चाचे सदस्य सुप्रियो भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे की, भाजप सरकारच्या काळात पूजा सिंघल या अनेक महत्वाच्या पदांवर राहिल्या आहेत. या कारवाईचं आम्ही स्वागत करतो. दोषींवर कडक कारवाई केली जावी.