Chhattisgarh : सुरजपूर जिल्हाधिकाऱ्यांचे 'ते' कृत्य सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात, IAS Association ने व्यक्त केली नाराजी
Chhattisgarh collector : औषधं आणायला गेलेल्या एका युवकाला जिल्हाधिकारी रणवीर शर्मा (Ranbir Sharma) यांनी कानशिलात लावून त्याला पोलिसांकडून मारहाण केली होती. त्याच्या या कृत्यावर आता आयएएस असोशिएशनने (IAS Association) नाराजी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याला कानशिलात लावली आणि नंतर त्याला पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना घडली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्यावर आता आयएएस असोसिएशनने नाराजी व्यक्त केली असून ते कृत्य नागरी सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.
सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे कृत्य केलंय ते अस्वीकाहार्य आणि सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. सनदी अधिकाऱ्याने नेहमी सहानुभूतीने वर्तन केलं पाहिजे आणि अशा कठीण परिस्थितीत समाजाशी संवेदनशील राहिलं पाहिजे. आयएएस असोसिएशन या कृत्याचा निषेध करत आहे, अशा आशयाचं एक ट्वीट आयएएस असोसिएशनने केलं आहे.
The IAS Association strongly condemns the behaviour of Collector Surajpur, Chhattisgarh.
— IAS Association (@IASassociation) May 23, 2021
It is unacceptable & against the basic tenets of the service & civility.
Civil servants must have empathy & provide a healing touch to society at all times, more so in these difficult times.
या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा अरेरावी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि अनेकांनी सोशल मीडियावर आयएएस असोसिएशला टॅग करुन प्रश्न विचारले. मुख्यमंत्री बघेल यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी या घटनेवर माफी मागितली आहे.
काय आहे घटना?
छत्तीसगड राज्यातील सुरजपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यावेळी आई-वडिलांसाठी मेडिकल स्टोअरमधून औषधं आणायला गेलेल्या युवकाला प्रिस्क्रिप्शन दाखवूनही मारण्यात आलं, त्याचा मोबाईल जिल्हाधिकाऱ्यांनी फोडला आणि त्याला कानशिलातही लावली. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जिल्हाधिकारी रणवीर शर्मा स्वत: शनिवारी दुपारी काय स्थिती आहे याची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका युवकाला त्यांनी थांबवलं. त्या युवकाने प्रिस्क्रिप्शन दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडील मोबाईल घेतला आणि रस्त्यावर आपटून फोडला. त्यानंतर त्यांनी त्या युवकाला कानशिलात हाणली. एवढ्यावरही ते थांबले नाहीत तर पोलिसांना बोलावून त्या युवकाला मारायचे आदेश दिले. पोलिसांनी साहेबांच्या आदेशाचे पालन केले आणि त्या युवकाला बदडलं. यामुळे त्या युवकाच्या पायावर गंभीर जखम झाल्याचं समजतंय.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी टीका करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chhattisgarh : औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलात हाणली; जिल्हाधिकाऱ्यांची अरेरावी कॅमेरात कैद
- Chhatrasal Stadium Murder Case : हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत
- Tamil Nadu Lockdown : तामिळनाडूमधील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढवला, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार