एक्स्प्लोर
Advertisement
EVM Issue | निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा, फॉरमॅलिटी म्हणून पत्र दिलं : राज ठाकरे
ईव्हीएमवर संशय आहे, त्यामुळे यापुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केली.
मुंबई : "माझ्या निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत. फॉरमॅलिटी म्हणून आम्ही त्यांना पत्र देऊन आलोय," अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या भेटीनंतर दिली. ईव्हीएमवर संशय आहे, त्यामुळे यापुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केली.
ईव्हीएमवर शंका
भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मी कोणाला मत करतो आणि ते कुठे जातं हे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये समजत नाही. ईव्हीएमवर लोकांना शंका आहे, आज नाही तर 20 वर्षांपासून आहे. 370 मतदारसंघात घोळ आहे. हरले आहेत त्यांनाही शंका आहे. जे जिंकले आहेत, त्यांनाही शंका आहे की, मी निवडून कसा आलो. 2014 च्या निवडणुकीआधी भाजप ईव्हीएमविरोधात आवाज उठवत होतं, कोर्टातही गेले होते. पण 2014 नंतर ते बोलायचे बंदच झाले. मतदान केल्यापेक्षा जास्त मतं पडली आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान व्हावं, लोकांना शिक्का मारुन कळू दे, जेणेकरुन लोकांना कळू दे, माझं मत मी कोणाला दिलंय आणि ते सगळ्यांसमोर मोजलं जाणार आहे."
निवडणूक आयोगाकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं
निवडणूक बॅलेट पेपवर घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत. फॉरमॅलिटी म्हणून आम्ही त्यांना पत्र देऊन आलोय. आम्ही बोलत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते, ते पाहता आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. उद्या कोणी विचारलं की तुम्ही निवडणूक आयोगाला भेटलात का तर भेटलो. बाकी या पुढचे निर्णय घ्यायचे असतील ते महाराष्ट्रात घेणार आहे," असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "ईव्हीएममधील चिप कुठून येते असं विचारलं असता, अमेरिकेतून येत असल्याचं उत्तर मिळालं. या मशिनमध्ये परदेशी हात असेल तर विश्वास कसा असेल? निवडणूक होतेय की गणिताची आकडेमोड होते? ज्या देशात दोन महिने निवडणुका होतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर काय फरक पडणार आहे. पण जे लोकांसमोर येईल, त्यात स्पष्टता असेल, विश्वास असेल." आता तरी सगळे पक्ष विचार करतील विधानसभा तसंच यापुढच्या निवडणुकीसाठी म्हणून आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्याचं राज ठाकरे म्हणाले. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मी सगळ्या पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून ईव्हीएम बंद करुन बॅलेट पेपरवरील मतदानावर या असं आवाहन केलं. तेव्हा कोणी ऐकलं नाही. मला वाटतं आता थोडा विचार करतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त. 'मला दिल्ली ओळखता आली नाही' राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत गेले आहेत. याविषयी विचारलं असताना राज ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिलं. "मला दिल्ली ओळखता आली नाही," असं ते म्हणाले. "2005 मध्ये आलो होता, त्यानंतर बराच विकास झाला इथे. विमानतळावर उतरल्यावर धौला कुआं अशी पाटी दिसायची. ती पाटी आज दिसली नाही, एवढा मोठा बोर्ड दिसला. खूप बदल झालाय दिल्लीत," असं त्यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना 'बाळ केशव ठाकरे, अ फोटोबायोग्राफी' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे 2005 मध्ये दिल्लीत गेले होते. त्यानंतर मे 2005 रोजी अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात या पुस्तकाचे प्रकाशन झालं होतं. मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिस का करायची? विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक अशीच झाली तर तयारीचा अर्थ काय आहे? सामना फिक्स असेल तर व्यायाम आणि नेट प्रक्टिस का करायची, असा सवाल त्यांनी विचारला. राजू शेट्टींसोबतच्या भेटवर राज ठाकरे म्हणतात... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे विधानसभा निवडणूक एकत्र लढणार का, असं विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, नाही... अशा भेटी होतच असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टी ईव्हीएम आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं यासाठी राजू शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं बोलले जात आहे. राज ठाकरे या आंदोलनात सहभागी झाले, तर आंदोलनाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल, असा अंदाज विरोधीपक्ष वर्तवत आहेत.आज दिल्लीत मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मनसे नेत्यांसह मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि मागणी केली कि, 'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलच्या वाढत्या तक्रारी आणि त्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता देशातील भवितव्याचा निर्णय म्हणजे सत्ताधीशांचं गणित होऊ नये... (१/२) pic.twitter.com/CowygFS0Wr
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) July 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement