बंगळुरूतील ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी होणार साजरी; कर्नाटक उच्च न्यायालयाची परवानगी, मध्यरात्री पार पडली सुनावणी
Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : आपला निर्णय कायम ठेवत कर्नाटक उच्च न्यायालयानं ईदगाह मैदानावर पूजा करण्यास परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.
Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी येथील ईदगाह (Hubballi Eidgah) मैदानावर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा करण्यास परवानगी दिली आहे. धारवाड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळत न्यायालयानं काही अटींसह पूजेला परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) गणेश चतुर्थीला परवानगी देण्याचा अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला.
दरम्यान, यापूर्वी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारताना हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं होतं. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीनं सुनावणी करण्यात आली. 31 ऑगस्टच्या मध्यरात्री या प्रकरणावरील सुनावणी पार पडली.
राज्य सरकारनं पूजेला परवानगी दिली होती
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानं यापूर्वी मैदानात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु द्विसदस्यीय खंडपीठानं (Division Bench) सरकारला पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या लोकांच्या अर्जांवर विचार करण्यास सांगितलं होतं. यानंतर राज्य सरकारनं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी पूजेला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कर्नाटक वक्फ बोर्डानं (Karnataka Waqf Board) ही जागा खा संपत्ती म्हणून घोषित केली होती. तसेच, वर्षानुवर्ष या मैदानात ईदची नमाज अदा केली जात असल्याचं कर्नाटक वक्फ बोर्डानं म्हटलं होतं.
कर्नाटक वक्फ बोर्डाची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटक सरकारनं वक्फ बोर्डाच्या या दाव्याला विरोध करत म्हटलं की, सरकारला ईदगाह मैदानात पूजा करण्यास परवानगी देण्यापासून रोखता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कर्नाटक वक्फ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वक्फ बोर्डानं सांगितलं की, 1964 पासून जमिनीवर नमाज अदा केली जात आहे. त्यामुळे ईदगाह मैदानात पूजा केल्यानं जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
गणेश चतुर्थीला बुधवारी ईदगाह मैदानावर पूजा
कर्नाटक वक्फ बोर्डाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं चामराजपेठ, बंगळुरू येथील इदगाह जमिनीच्या संदर्भात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं की, कर्नाटक उच्च न्यायालय 2.5 एकर जमिनीच्या मालकीबाबत निर्णय देईल. हुबळीच्या ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.