मुसळधार पावसाचा खिशावरही परिणाम! भाज्यांचे भाव गगनाला भिडले, आलं आणि टोमॅटो विक्रमी किमतीला
Vegetable Price Hike : पावसामुळे भाज्या महागल्या आहेत. आलं आणि टोमॅटो 100 रुपये किलोनं मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत आहे.
Rain Effect on Vegetables : राज्यासह देशात मान्सून (Monsoon) चांगलाच सक्रिय झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरही परिणाम होताना दिसत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. आधी उन्हामुळे शेतकऱ्यांची पिकं करपली होती, त्यानंतर अवकाळीनं गोंधळ घातला. आता तर, पावसामुळे पिकांची नासाडी होताना दिसत आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे 50 रुपये किलोच्या पुढे आहेत. आलं आणि टोमॅटो विक्रमी किमतीला विकलं जात आहे. महाराष्ट्रातील भंडाऱ्यात टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महाग आहे. आल्याच्या किमतीनंही रडकुंडीला आणलं आहे.
पावसामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले
बाजारात कोणतीही भाजी 50 रुपये किलोच्या खाली मिळत नाहीय. टोमॅटोचे दर 100 रुपये किलोच्या पुढे आहेत. महाराष्ट्रातील भंडाऱ्यात टोमॅटो 140 रुपये किलोनं विकले जात आहेत. आल्याच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. आलं विक्रमी किमतीला विकलं जात आहे. पाव किलो आलं 80 ते 100 रुपयांना विकलं जात आहे. वाढत्या किमतीमुळे अनेक गृहिणी आलं घेणंच टाळताना दिसत आहेत. यापूर्वी रखरखत ऊन आणि आता मुसळधार पाऊस यामुळे भाज्यांच्या उत्पादनात 70 टक्क्यांनी घट झाली आहे. टोमॅटो, कारलं, भेंडी, भोपळा यासह अनेक भाज्या महागल्या आहेत.
देशात भाजीपाल्याची किरकोळ किंमत
- टोमॅटो - 100 रु./किलो
- आले - 320 रुपये/किलो
- घोसळी - 50 रुपये/किलो
- भिंडी - 60 रुपये/किलो
- कारला - 60 रुपये/किलो
- भोपळा - 50 रुपये/किलो
- फ्लॉवर - 60 रुपये/किलो
- पडवळ - 60 रुपये/किलो
- सोयाबीन - 120 रुपये/किलो