Heatwave in India : भारतात दोन दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज
Heatwave in India : भारतात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. महाराष्ट्रातील काही भागात देखील उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
Heatwave in India : वाढत्या उष्णतेमुळे आधीच अंगाची लाही-लाही झालेली असताना आता पुन्हा दोन दिवस संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार 14 आणि 15 मे रोजी भारतात उष्णतेची लाट असणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल. आयएमडीने आपल्या हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, येत्या तीन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल.
Severe heatwave prevailing in Punjab, Haryana, Delhi, UP, MP, Rajasthan & Vidarbha. Temperatures are ranging from 40-46°C which is above normal temp. Red & orange warnings were issued for parts of Rajasthan, MP & Haryana: Mrutyunjay Mohapatra, Director General of Meteorology, IMD pic.twitter.com/4OQtXrYxLe
— ANI (@ANI) May 14, 2022
दरम्यान, पुढील दोन दिवसांत भारताच्या पूर्व भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये शनिवारपासून तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राजस्थानच्या पश्चिम भागात 14 मे रोजी म्हणजे आज उष्णतेची तीव्र लाट असणार आहे. शिवाय 14 मे रोजी पूर्व राजस्थानमध्ये आणि 15 मे रोजी राजस्थानच्या इतर भागात उष्णतेच्या लाट असेल. 14 मे रोजी उत्तर प्रदेशमधील पश्चिम भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट असेल. तर पंजाबमध्ये 15 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
महाराष्ट्र तापणार
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 आणि 15 मे रोजी राज्यातील विदर्भात उष्णतेची लाट असेल. अमरावतीमध्ये पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अकोल्यात काल 44.7 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस हेच तापमान कायाम राहील, असा अंदाज आहे.
भारतातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता
16 आणि 17 मे रोजी जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाट व गारांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 आणि 17 मे रोजी उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागात हलक्या स्वरूपात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.