दिल्लीतून व्यापाऱ्याला अटक, दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. लष्कर-ए-तैयबा आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप या व्यापऱ्यावर आहे.
![दिल्लीतून व्यापाऱ्याला अटक, दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप hawala operator arrested who funding lashkar e taiba and al badr terrorists दिल्लीतून व्यापाऱ्याला अटक, दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/3b5d3b487d9a9d274b602a886daf69841660919723639328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबा आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. मोहम्मद यासीन असे संशयीत आरोपीचे नाव आहे. यासीन याने आतापर्यंत लाखो रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे. यासीनकडून सात लाखांची रोकड, मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून हवालाद्वारे यासीन याच्याकडे 24 लाख रुपये आले होते. त्यापैकी 17 लाख रुपये दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचले आहेत. 18 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अब्दुल हमीद मीर नावाच्या दहशतवाद्याला जम्मू-काश्मीरमधून अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद यासीनला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लष्कर-ए-तैयबा आणि अल बद्र या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याच्या संशयावरून या हवाला ऑपरेटरला अटक केली आहे. दिल्लीतील तुर्कमान गेट येथून त्याला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद यासीन दिल्लीच्या मीना बाजारमध्ये कपड्यांचा व्यवसाय करायचा. या व्यवसायाच्या नावाखाली तो हवाला व्यवसाय करत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचा दावा आहे की, मोहम्मद यासीनला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतून हवालाद्वारे 24 लाख रुपये पाठवण्यात आले होते. त्यापैकी 17 लाख रुपये त्याने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना दिले होते.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी 18 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून दहशतवादी अब्दुल हमीद मीरला अटक केली होती. त्याच्याकडून 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर या हवाला ऑपरेटरबाबत माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने यासीनला अटक केली.
यासीन याने 17 ऑगस्ट रोजी अब्दुल हमीद मीर याला 10 लाख रुपये दिले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जम्मू-काश्मीर पोलिसांकडून माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तुर्कमान गेट येथून अटक केली.
कोण आहे मोहम्मद यासीन?
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचा दावा आहे की, मोहम्मद यासीन हा व्यवसायाने कपड्यांचा व्यापारी आहे. तो दिल्लीतील मीना बाजार येथे व्यवसाय करतो. चौकशीदरम्यान यासीनने सांगितले की, हवालाचे पैसे दक्षिण आफ्रिकेतून यायचे. ते पैसे भारतात मुंबई आणि सुरत येथे पोहोचायचे. तेथून हवाला नेटवर्कद्वारे ही रक्कम दिल्लीत पोहोचायची. या हवाला साखळीत यासीन दिल्ली लिंकशी संबंधित होता. येथून पैसे घेतल्यानंतर तो जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबा आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना पाठवत असे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)