Republic Day 2025 LIVE: प्रजासत्ताक दिनाची 76 वर्ष... देशभरात उत्साह, कर्तव्य पथावर जग पाहील भारताची ताकद
Happy Republic Day 2025 LIVE Updates: आज देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
LIVE
Background
Happy Republic Day 2025 LIVE Updates: आज देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरासह संपूर्ण देशभरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवी दिल्लीचे डीसीपी देवेश महाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेत कोणत्याही प्रकारची चूक होण्याची शक्यता नाही. परेड दरम्यान राजधानीत सहा-स्तरीय बहु-स्तरीय सुरक्षा घेरा तयार करण्यात आला आहे. यासोबतच, 60 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 15 हजार सैनिक फक्त ड्युटी मार्गाभोवती तैनात असतील. निमलष्करी दलाचे जवान, एनएसजी कमांडो, एसपीजी कमांडो, बॉम्ब शोधक पथक, स्वाट कमांडो, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि डॉग स्क्वॉड देखील तैनात केले जातील.
दिव्यांगांवरील अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून निषेध आंदोलन
अकोला: अकोल्यात दिव्यांगांसंदर्भातील अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलंय. यावेळी दिव्यांगाच्या मानधनात वाढ करावी, दिव्यांगांना घरकुल द्यावे, दिव्यांगांच्या मुलांची पेन्शन 21 वर्ष झाल्यानंतर बंद करू नये, दिव्यांगासाठी व्यवसाया करीता 200 स्केअर फुट जागा द्यावी, दिव्यांग कल्याणासाठी राज्याच्या एकूण बजेटच्या पाच टक्के निधीची तरतूद करावी, जिल्हास्तरावर स्वतंत्र खाते उघडून तो खर्च करावा, दिव्यांगाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती आणि प्रवेश शुल्क माफ करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्यात. यावेळी दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष मोमीन शेख यांनी गाडगेबाबा करून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलनात शेकडो प्रहार पक्षाचे दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यात GBSची लागण झालेल्या अन् सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार
Pune: पुण्यात 40 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीस GBS ची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतं असल्याने या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला रुग्णालयात ICU मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने साध्या रूममध्ये रुग्णास हलवण्यात आले. मात्र काल अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येतं असल्याने पुन्हा एकदा ICU मध्ये भरती करण्यात आले.
मात्र उपचारदरम्यान या रुग्णाचा मृत्यू झालाय. या रुग्णास पुण्यात GBSची लागण झाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्याशिवाय रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतीत प्राथमिक माहिती ही शवविच्छेदन आणि व्हीसेरा तपासणी अहवाला नंतरच प्राप्त होईल. मात्र GBS बाबतीत कोणीही अफ़वा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरूण जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे
तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे.
कर्नाक ब्रीज गर्डर लॉन्चिंगचे काम संपले; तब्बल पाच तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू
मुंबई: सकाळी साडे पाच वाजता संपणारा ब्लॉक सव्वा दहा वाजता संपला, हा गर्डर बसवताना एक जॅक तुटला त्यामुळे एका कामगाराला देखील दुखापत झाली आणि काम अखेर बंद करावे लागले. परिणामी मध्य रेल्वेच्या लोकल केवळ भायखळा, दादर आणि कुर्ला स्थानकात थांबवण्यात येत होत्या. याचा मोठा फटका प्रवाश्यांना बसला. अखेर पाच तासांनंतर लोकल वाहतूक सीएसएमटीपर्यंत सुरू करण्यात आली आहे.
मात्र गर्डरचे काम अर्धवट असल्याने बी एम सी आणि मध्य रेल्वेकडून एका क्रेन द्वारे गर्डर सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तरी देखील या पुलाखाली 30 किमी प्रति तासाची वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. केवळ लोकल वाहतुकीवर नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील याचा फटका बसला, मेगा ब्लॉक दरम्यान 11 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. मात्र ब्लॉक अचानक वाढल्याने आणखीन 13 मेल एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलण्यात आले. याच प्रमाणे 17 मेल एक्सप्रेस कल्याण, पनवेल, दादर स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या तर 12 गाड्या दादर, एल टी टी, पनवेल, नाशिक वरून सोडण्यात आल्या,
यासोबत 4 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. या गर्डर लॉन्चिंग वेळी नेमके काय चुकले? कशामुळे उशीर झाला यासंदर्भात मुंबई महापालिकेला विचारणा केली असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मुंबईकरांना माहिती देण्यात आली नाही.
धुमाकूळ घालत चार गायींना जखमी करणारा बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन
संगमनेर: तालुक्यातील खराडी गावातील पर्बत वस्तीवर काल(25 जानेवारी) सकाळी 8 वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात चार गाई जखमी झाल्या होत्या. दरम्यान आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान परिसरात ऊस तोड करण्यासाठी आलेल्या लोकांनी उसाचे पाचट पेटवले. त्यामुळे ऊसात लपलेला हा बिबट्या वस्तीकडे आला आणि चार गायींवर हल्ला केला. त्यांनतर वन विभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केले. वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी चोहो बाजूंनी कडे बनवत जाळी टाकून बिबट्याला जेरबंद केलंय. बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा हा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झालाय.
प्रजासत्ताकदिनी पहिलं पाऊल जालन्यात ठेवलं हा माझ्यासाठी सुवर्णयोग; पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
जालना: जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच तेही प्रजासत्ताक दिनी पंकजा मुंडे यांचे जालन्यात आगमन झालं. आज त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पाऊल ठेवणे यापेक्षा मोठा सुवर्णयोग काय हे असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील लोकांना कधी पक्षपातीपणा जाणवनार नाही, अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल, असं वचन देखील पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना दिलं.