Gujrat Election 2022: गुजरातमध्ये काँग्रेस उमेदवारावर भाजपकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
Gujrat Election 2022: बनासकांठामधील दांता विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार कांती दराडी यांनी आपल्यावर भाजपने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.
Gujarat Election 2022: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या सुरू आहे. या मतदानापूर्वी काँग्रेसने भाजपवर मोठा आरोप केला. गुजरातमध्ये बनासकांठातील दांता विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार कांती खराडी यांच्यावर हल्ला करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा काँग्रेसने केला आहे. भाजप उमेदवार लधू पारघी यांचा या कृत्यामागे हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रात्रीच्या अंधारात आपण 15 किमी जीव मुठीत धरून पळून आल्याने बचावलो असल्याचे कांती खराडी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आमदार कांती खराडी यांनी म्हटले की, माझ्या मतदारांकडे जात असताना भाजपचे उमेदवार लधू पारघी यांच्यासह एल. के. बरड आणि त्यांचा भाऊ वंदन यांच्यासह इतरांनी माझ्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्या हातात तलवारी असल्याचे खराडी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, बामोदरा चौपदरी मार्गातून जात होते. त्यावेळी भाजप उमेदवाराने आमचा मार्ग रोखला. त्यावेळी आम्ही माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागील बाजूनेही आणखी काहीजणांनी आमच्यावर हल्ला केला. त्या ठिकाणी असलेली परिस्थितीती पाहता मी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले. घडलेला प्रकार हा अतिशय संतापजनक असल्याचे कराडी यांनी म्हटले.
भाजप उमेदवारांवर आरोप
काँग्रेसचे आमदार, उमेदवार कांती खराडी यांनी म्हटले की, आम्ही कार घेऊन मागे फिरत असताना काही वाहनांनी आमचा पाठलाग केला. यामध्ये भाजपचे उमेदवार लधू पारघी आणि त्यांच्यासह इतर दोघेजण तलवारी घेऊन आले होते. जीव वाचवण्यासाठी आम्ही 10 ते 15 किमी अंतर पळलो आणि जंगलात आश्रय घेतला. दोन तास आम्ही तिथे होतो, असेही खराडी यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाकडे आपण चार दिवसांपूर्वी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप खराडी यांनी केला.
राहुल गांधी यांच्याकडून निषेध
काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला. आम्ही निवडणूक आयोगाकडे निमलष्करी दला तैनात करण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
कांग्रेस के आदिवासी नेता और दांता विधानसभा प्रत्याशी, श्री कांतिभाई खराडी पर BJP के गुंडों ने जानलेवा हमला किया और अब वो लापता हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 4, 2022
कांग्रेस ने EC के अतिरिक्त अर्धसैनिक बल की तैनाती की मांग की थी, मगर आयोग सोया रहा।
भाजपा सुन ले - न डरे हैं, न डरेंगे, डट कर लड़ेंगे। #DaroMat
दांता ही अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली जागा असून काँग्रेसकडून खराडी आणि भाजपकडून लधूभाई पारघी या जागेसाठी रिंगणात आहेत. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात राज्याच्या 92 मतदारसंघांसह सोमवारी या जागेवर मतदान होणार आहे. खराडी हे मागील 10 वर्षांपासून दांतामधील आमदार आहेत.