Gujarat Air India Plane Crash: 1 सेकंदात दोन्ही इंजिनं झाली CUTOFF; गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा (Gujarat Air India Plane Crash) प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. याचे एक महत्त्वाचे कारण दोन्ही इंजिन बंद पडणे होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विमानाने आवश्यक उंची गाठली होती, परंतु त्यानंतर दोन्ही इंजिने 'रन' मोडवरून 'कटऑफ' मोडवर गेली. AAIB च्या अहवालात पायलटच्या संभाषणाचाही उल्लेख आहे. इंधन पुरवठा का बंद केला? असा पायलटनं सह पायलटला प्रश्न विचारला. यावर मी काहीच केलं नाही असं सह पायलटनं प्रत्युत्तर दिले.
एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालातील 10 महत्त्वाचे मुद्दे-
1. नेमकं काय झालं होतं?
अहमदाबादहून लंडन (गॅटविक) जात असलेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान (VT-ANB) टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. हा अपघात 12 जून 2025 रोजी दुपारी 1.39 वाजता घडला.
2. अपघाताच्या चौकशीत कोण सहभागी आहे?
भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने तपास सुरू केला. अमेरिका (NTSB), ब्रिटन (AAIB-UK), पोर्तुगाल आणि कॅनडा सारख्या अनेक देशांतील तज्ञ देखील मदत करत आहेत.
3. किती लोक मरण पावले?
एकूण 260 लोक मरण पावले - 229 प्रवासी, 12 कर्मचारी आणि जमिनीवर 19 लोक. 1 प्रवासी गंभीर जखमी झाला, उर्वरित 67 जणांना किरकोळ किंवा कोणतीही दुखापत झाली नाही. फक्त 1 प्रवासी वाचला.
4. विमानाबद्दल माहिती-
सदर एअर इंडियाचं विमान 2012 मध्ये बनवण्यात आले होते, GE GENx-1B इंजिन बसवण्यात आले होते. त्याच्या देखभालीमध्ये कोणताही मोठा दोष आढळला नाही. उड्डाणापूर्वी काही किरकोळ तांत्रिक समस्या होत्या, परंतु सर्व काही नियंत्रणात होते.
5. किती नुकसान झाले?
विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. जमिनीवरील पाच इमारतींनाही मोठे नुकसान झाले.
6. विमान कुठे पडले?
सदर एअर इंडियाचं विमान धावपट्टीपासून फक्त 1 किमी अंतरावर असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आदळले. सुमारे 1000 फूट x 4000 फूट अंतरावर विमानाचा पसरलेला ढिगारा आढळला.
7. फ्लाइट रेकॉर्डर (ब्लॅक बॉक्स)चं काय?
एका रेकॉर्डरमधून 46 तासांचा डेटा आणि 2 तासांचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले, ज्यामध्ये अपघाताचा वेळ समाविष्ट होता. दुसरा रेकॉर्डर खराब झाला होता, त्यातून डेटा काढता आला नाही.
8. पायलट आणि एटीसी संभाषण-
उड्डाणाची परवानगी 1.37 PM वाजता मिळाली. दोन मिनिटांनंतर 01.39 PM वाजता, पायलटने "मेडे" कॉल केला, जो आपत्कालीन परिस्थिती दर्शवितो.
9. उड्डाण तपशील-
विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. वजन मर्यादेत होते आणि कोणत्याही धोकादायक वस्तू नव्हत्या. उड्डाणापूर्वी दोन्ही पायलट पूर्णपणे तंदुरुस्त होते.
10. अपघात कशामुळे झाला?
उड्डाणानंतर लगेचच, दोन्ही इंजिनचे इंधन कटऑफ स्विच बंद झाले, ज्यामुळे इंजिन थांबले. कॉकपिटमधील संभाषणात एका वैमानिकाने विचारले की, स्विचेस कोणी बंद केले, तर दुसऱ्याने "नाही" म्हटले. वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक इंजिन व्यवस्थित सुरू झाले नाही. एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना इंधनपुरवठा ठप्प झाल्यानं झाल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात म्हटलं आहे.

























