Domestic Flights | विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
महाराष्ट्र सरकारने डोमेस्टिक हवाई प्रवाशांसाठी आज नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन राहणं सक्तीचं असणार आहे. पण एक आठवडा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीससाठी येणाऱ्यांना मात्र यातून सूट दिली जाईल. मात्र यासाठी स्थानिक प्रशासनाला मोबाईल नंबरसह संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र सरकार ने डोमेस्टिक हवाई प्रवाशांसाठी आज नियमावली जाहीर केली आहे. आजपासून सुरू झालेल्या हवाई सेवेचा लाभ घेऊन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये कुठलीही माहिती लपवण्यात आली किंवा नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. तसं परिपत्रकच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढलं आहे.
विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारची नियमावली
- राज्यात उतरणाऱ्या प्रवाशांना होम क्वॉरंटाईन राहणं सक्तीचं असणार आहे. तसा शिक्काच त्यांच्या डाव्या हातावर मारला जाणार आहे. मात्र जे प्रवासी एक आठवडा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी राज्यात येतील त्यांना परतीचं तिकीट आणि मोबाईल फोनसह इतर सर्व माहिती स्थानिक प्रशासनाला दिल्यावर होम क्वॉरंटाईन होण्यापासून सूट दिली जाणार आहे. तसेच इतर कामांसाठी आलेल्या व्यक्तींना संबंधित अधिकाऱ्यांना स्वतःची सर्व माहिती उपलब्ध करून दिल्यावर होम क्वॉरंटाईनपासून सूट मिळेल.
- सूट मिळालेल्या प्रवाशांना कुठल्याही हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक परिसरात जाता येणार नाही.
- कुठलीही लक्षणं असलेल्या प्रवाशांना विमान प्रवास करण्यास सक्त मनाई असेल.
- प्रत्येक प्रवाशाला आरोग्य सेतू एप डाऊनलोड करणं बंधनकारक असेल.
- महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि उपयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी. या नोडल अधिकाऱ्यांनी संबधीत जिल्हाधिकरी कार्यालयातील प्रोटोकॉल अधिकऱ्यांशी समन्वय साधायचा आहे.
- एअरपोर्ट प्रशासनाकडून या नोडल अधिकाऱ्यांना येणाऱ्या विमानाच्या प्रवाशांची संपूर्ण यादी, फोन नंबर्स, आगमन तारीख आणि वेळ, अंतिम गंतव्य स्थान अशी माहिती किमान विमान येण्याच्या 6 तास आधी उपलब्ध करून द्यावी.
- प्रामुख्याने प्रवासी हा प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रहिवासी नसावा. त्याला कुठलीही लक्षणं नसावीत. मागच्या दोन महिन्यात कोरोनाची लागण झालेला नसावा. कुठल्याही कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेला नसावा.
- एअरपोर्टवर प्रवाशांच्या थर्मल स्क्रिनिंगसाठी वेगळी व्यवस्था उभारण्यात यावी. यासाठी एअरपोर्ट आणि महापालिका प्रशासनाने समन्वय साधून पुरेसं मनुष्य बळ आणि वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून घ्यावा.
- या प्रवाशांना एअरपोर्ट ते राहत्या ठिकाणी किंवा पुन्हा एअरपोर्ट पर्यंत सुरक्षित अंतर ठेवून खाजगी वाहनात प्रवास करण्यास परवानगी दिली जावी.
- एअरपोर्टच्या बाहेरच्या परिसरात पोलिसांनी वाहतुकीवर कुठलेही निर्बंध न आणता वाहतूक सुरळीत ठेवण्यात यावी.
मागील दोन दिवसांपासून राज्यात इतर राज्यातून विमान प्रवाशांना येण्यास परवानगी द्यायची का यावरून खल सुरू होता. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये या मुद्द्याला हात घालून केंद्रावर पूर्वतयारी अभावी निर्णय घेण्याचं खापर फोडलं. तसेच उशिरा रात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मुंबई सारख्या रेड झोन असलेल्या ठिकाणी डोमेस्टिक विमान वाहतुकीला परवानगी देणं म्हणजे लोकांचा जीव धोक्यात घालण्यासारखं असेल असं मत व्यक्त केलं होतं. असं असलं तर आज पासून राज्यात डोमेस्टिक हवाई वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका विरोधक करू लागले आहेत.
संबंधित बातम्या :
Domestic Flights Resume | 60 दिवसांनी टेकऑफ, देशांतर्गत विमान सेवा सुरु
Domestic Flights Resume | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थितीचा आढावा