सरकार E-Passport कधीपासून जारी करणार? केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरण राज्यसभेत म्हणाले...
E-Passport सेवा कधी सुरु केली जाईल याची कोणतीही निश्चित तारीख सरकारने दिलेली नाही, परंतु ही सेवा 2022-2023 या आर्थिक वर्षात सुरु केली जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिली.
नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती की सरकार लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी ई-पासपोर्ट सेवा सुरु करेल. या घोषणेनंतर ई-पासपोर्ट सेवा कधी सुरु होणार, याबाबत सातत्याने अंदाज वर्तवले जात आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे देत सरकारने लवकरच ई-पासपोर्ट सेवा सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. ही सेवा कधी सुरु केली जाईल याची कोणतीही निश्चित तारीख सरकारने दिलेली नाही, परंतु ही सेवा 2022-2023 या आर्थिक वर्षात सुरु केली जाईल.
राज्यमंत्र्यांचं राज्यसभेत उत्तर
राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी राज्यसभेत ई-पासपोर्टबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, "2022-2023 या आर्थिक वर्षात ई-पासपोर्टची सुविधा सुरु केली जाईल. सरकारने असंही म्हटलं आहे की, ई-पासपोर्टमध्ये एम्बेडेड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि अँटेना असेल. या दोघांच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक्सची निर्मिती केली जाणार आहे. हा पासपोर्ट सुरु करण्यामागे सरकारचा उद्देश हा आहे की पासपोर्टशी संबंधित फसवणूक पूर्णपणे थांबवता यावी. सध्याच्या पासपोर्टपेक्षा तो अनेक प्रकारे वेगळा असेल.
ई-पासपोर्टची वैशिष्ट्ये
* ई-पासपोर्ट हा आता वापरल्या जाणाऱ्या पासपोर्टसारखाच असेल, पण कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यात एम्बेडेड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप बसवली जाईल. ज्याद्वारे खरा आणि बनावट पासपोर्ट सहज ओळखता येईल.
* या पासपोर्टमध्ये नागरिकाचं नाव, जन्मतारीख, पत्ता आदी महत्त्वाची माहिती नोंदवली जाणार आहे.
* यासोबतच या पासपोर्टच्या चिपमध्ये प्रवाशाच्या प्रवासाचा तपशीलही असेल. प्रवाशांचे सर्व तपशील एकाच स्क्रीनिंगवरच कळतील.
* शिवाय या पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. पूर्वीप्रमाणेच पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सुरु ठेवण्याची सरकारची तयारी आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात ई-पासपोर्टची घोषणा
2022-2023 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषण सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात डिजिटायझेशनवर भर दिला होता आणि सरकार लवकरच ई-पासपोर्टची सुविधा सुरु करणार असल्याचं सांगितलं होतं. या सुविधेमुळे लोकांना परदेशात जाणं सोपं होणार आहे. ई-पासपोर्ट पुढील आर्थिक वर्षात सुरु करण्याची सरकारची तयारी आहे.