एक्स्प्लोर
Good Friday | यंदा गुड फ्रायडेवर कोरोनाचं सावट, गुड फ्रायडेचं नेमकं महत्व काय?
यादिवशी येशूला सुळावर लटकावून हत्या करण्यात आली. या दिवसाची आठवण म्हणून ख्रिस्ती बांधव हा दिवस साजरा करतात. 'गुड फ्रायडे'ला ख्रिश्चन धर्मात विशेष महत्त्व आहे

मुंबई : गुड फ्रायडे (Good Friday), याच दिवशी येशूला क्रुसवर (वधस्तंभ) खिळवले जाऊन त्याची हत्या करण्यात आली. या दिवसाची आठवण म्हणून ख्रिस्ती बांधव हा दिवस साजरा करतात. 'गुड फ्रायडे'ला ख्रिश्चन धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रभू येशूंनी संपूर्ण जगासाठी दिलेले बलिदान दिल्याबद्दल हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र यंदा सर्वधर्मिय सण आणि उत्सवाला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. यंदा कोरोनामुळे गुडफ्रायडेला देखील फटका बसला आहे. देश तसेच राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चर्च देखील बंदच असणार आहेत. गुडफ्रायडेला चर्चच्या क्रॉसला चुंबन करु नये अशा सूचना मुंबईतल्या सर्व चर्चमध्ये देण्यात आल्यात. तसंच कोरोनाच्या भीतीपोटी मुंबईतील 123 चर्चच्या प्रवेशद्वारावर होली वॉटर ठेवण्यात येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने चर्च बंद करण्यात आल्या आहेत. गुड फ्रायडेचे महत्व का आहे? ख्रिश्चन धर्माचे प्रवर्तक येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी या दिवशी बलिदान दिले होते. येशूंना यावेळी खूप यातना दिल्या आणि त्यांना सुळावर चढविले. तेव्हाही प्रभू येशूंच्या मुखातून क्षमा आणि कल्याणाचा संदेशच बाहेर पडला. हा त्यांच्या क्षमाशील तत्वांचा आदर्श मानला जातो. "हे प्रभो, यांना माफ कर. कारण यांना माहीत नाही की ते काय करत आहेत.." असे शेवटचे उद्गार येशूंच्या मुखातून निघाले. त्यामुळे ख्रिश्चन बांधव येशूंचे उपकार मानत उपवास करतात. तसेच चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना करतात. येशूंना का मारले ? असं सांगितलं जातं की, दोन हजार वर्षांपूर्वी जेरुसलेममधील गॅलिली प्रांतात तरुण येशू लोकांना मानवता, बंधूभाव, एकता आणि शांतीचा संदेश देत होते. लोकांनी त्यांना ईश्वर मानण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरवून त्याचा गैरफायदा घेणार्या धर्मगुरुंच्या डोळ्यात त्यांची लोकप्रियता खूपत होती. त्यामुळे त्यांनी रोमचा शासक पिलातूस याचे कान भरुन येशूंवर राजद्रोहाचा आरोप लावला. त्यानंतर त्यांना काट्यांचा मुकूट घालण्यात आला. हाल-हाल करून त्यांना सुळावर चढविले. गुडफ्रायडेला काय करतात ख्रिस्ती बांधव या दिवशी दुपारनंतर ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र येऊन तीन वाजता प्रार्थना करतात. या संपूर्ण आठवड्यालाच ख्रिश्चन धर्मात पवित्र मानले जाते. मात्र, चर्चमध्ये प्रार्थनेशिवाय कोणताही उत्सव करण्यात येत नाही.
आणखी वाचा























