2024 मध्ये सोन्यानं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, गेल्या 10 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी
नोव्हेंबरपर्यंत सोन्याने 28 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने गेल्या 10 वर्षांतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC)अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
Gold Price 2025 : यावर्षी नोव्हेंबरपर्यंत सोन्याने 28 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने गेल्या 10 वर्षांतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC) ताज्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. अहवालानुसार, वार्षिक कामगिरीच्या बाबतीत, सोन्याने या वर्षी बहुतेक मालमत्ता वर्गांना मागे सोडले आहे. केंद्रीय बँकांकडून खरेदी आणि गुंतवणुकीच्या मागणीने या वर्षी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.
आशियाई देशांमधील गुंतवणुकीची मागणी मजबूत
संपूर्ण कॅलेंडर वर्षात आशियाई देशांमधील गुंतवणुकीची मागणी मजबूत राहिली आहे. तर तिसऱ्या तिमाहीत अमेरिकन डॉलर आणि रोखे उत्पन्न कमकुवत झाल्याने पाश्चात्य गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, नोव्हेंबरमध्ये सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या मजबूत मागणीचा कल थांबला. आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर सोन्याच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक 2.1 अब्ज डॉलर म्हणजेच 28.6 टन कमी झाली. गेल्या महिन्यात केवळ उत्तर अमेरिकेत आवक दिसून आली. युरोप, आशिया आणि इतर क्षेत्रांमध्ये बहिर्वाह नोंदवले गेले. नोव्हेंबरमध्ये सलग 11व्या महिन्यात युरोपमध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक घटली आहे.
या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पाहिल्यास, गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 2.6 अब्ज डॉलरने वाढली आहे. मे 2024 पूर्वीही, सलग 12 महिने जागतिक स्तरावर गोल्ड ईटीएफमध्ये आउटफ्लो दिसून आला होता. चीनच्या मध्यवर्ती बँकेने खरेदी थांबवल्यानंतर, सोन्याला गुंतवणुकीचा सर्वाधिक आधार मिळाला. भविष्यात ईटीएफची मागणी मंद राहिल्यास सोन्यावर दबाव येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी
दरम्यान, चीनची मध्यवर्ती बँक पीपल्स बँक ऑफ चायना (PBoC) ने दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर म्हणजेच एप्रिलमध्ये पहिल्यांदाच त्यांनी नोव्हेंबरमध्ये 16,000 औंस (4.5 टन) सोने खरेदी केले. अशाप्रकारे, चालू कॅलेंडर वर्षात नोव्हेंबरपर्यंत चीनच्या सोन्याच्या साठ्यात अंदाजे 34 टन वाढ झाली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने 2023 मध्ये सोन्याच्या साठ्यात 225 टन वाढ केली होती. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमतीत झालेली घसरण आणि ट्रम्प यांच्या विजयानंतर बदललेली भू-राजकीय परिस्थिती पाहता चीनच्या मध्यवर्ती बँकेने पुन्हा सोन्याची खरेदी सुरू केली आहे. यापूर्वी, या वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या सोन्याच्या साठ्यात सलग 18 महिने वाढ झाली होती. एप्रिलमध्ये चीनचा सोन्याचा साठा 2 टनांनी वाढून 2,264 टन झाला. तथापि, चीनच्या सोन्याच्या साठ्यात 18 महिन्यांतील ही सर्वात कमी वाढ होती.
ऑक्टोबरमध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी 60 टन सोने खरेदी केले
जागतिक सुवर्ण परिषदेच्या डेटावरून असे दिसून आले आहे की ऑक्टोबरमध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी 60 टन सोने खरेदी केले, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) सर्वाधिक वाटा होता. भारताने ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा साठा 27 टनांनी वाढवला आणि यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सोन्याची एकूण खरेदी 77 टन झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण पाचपट अधिक आहे. या यादीत तुर्की दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत सोन्याचा साठा 72 टनांनी वाढवला आहे. तर पोलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी-ऑक्टोबर 2024 दरम्यान, पोलंडने आपल्या सोन्याच्या साठ्यात 69 टन वाढ केली. भारत, तुर्किये आणि पोलंड या तीन देशांच्या मध्यवर्ती बँकांनी यावर्षी 60 टक्के सोने खरेदी केले आहे.