Goa Lockdown : गोव्यात 5 दिवसांच्या लॉकडाऊननंतर 8 दिवसांसाठी कठोर निर्बंध; काय सुरु, काय बंद?
Goa Lockdown : गोव्यात आजपासून लॉकडाऊन नाही मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी असणार कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. सकाळी 7 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार आहेत. तसेच निर्बंध न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
Goa Lockdown : देशातील सर्वात लहान राज्य असणाऱ्या गोव्यामध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या वर्षी गोव्यामध्ये कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नव्हता. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं गोव्यातील परिस्थितीही बिकट झाली आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णयही प्रशासनाला घ्यावा लागला. लॉकडाऊनचं पर्व संपल्यानंतर आता मात्र गोव्यात लॉकडाऊन नसून कठोर निर्बंध लादण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तसेच लॉकडाऊनंतर आता गोव्यात आठ दिवसांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
गोव्यात 8 दिवसांसाठी कठोर निर्बंध
मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, पुढच्या सोमवारपर्यंत गोव्यात काही निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये कसिनो, शाळा, साप्ताहिक बाजारपेठा बंद असणार आहेत, तर मासळी बाजारही केवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु असणार आहेत. याव्यतिरिक्त बारदेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. तर रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्याचसोबत धार्मिक स्थळांवर जाण्यासही परवानगी नसणार आहेत. स्पा, सलून, सिनेमागृह काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
काय सुरु, काय बंद?
लग्नसमारंभांसाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही परवानगीही कलेक्टर्सच्या परवानगीनंतर देण्यात येईल. सोशल डिस्टंसिंगचही पालन करणं अनिर्वाय असणार आहे. यासाठीही निर्देश जारी करण्यात आले आहेत. कठोर निर्बंधांबाबत सांगण्यात आलं आहे की, राज्यात राजकीय सभांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. दरम्यान, गोव्यात हे निर्बंध 10 मेपर्यंत लागू असणार आहेत. त्यानंतर हे निर्बंध आणखी कठोर करायचे की, शिथील करायचे, यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
गोव्यातील कोरोना स्थिती
गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 2 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 54 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. चिंतेची बाब म्हणजे, गोव्यातील संसर्ग होण्याचा दर अधिक आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती, परंतु, मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत.