एक्स्प्लोर
Advertisement
गोव्यातील 'बिग डॅडी कसिनो' विरोधात काँग्रेसची निदर्शनं
गोव्यातील 'बिग डॅडी कॅसिनो'ने केलेल्या अतिक्रमणविरोधातील कारवाईच्या वेळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार करणार्या महिलेविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे
पणजी : 'बिग डॅडी कॅसिनो'ने केलेल्या अतिक्रमणविरोधातील कारवाईच्या वेळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार करणार्या महिलेला कॅसिनो लॉबीचा पाठिंबा असल्याचा आरोप करत गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि मोन्सेरात यांच्या समर्थकांनी शनिवारी सायंकाळी बिग डॅडी कॅसिनोच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला.
यावेळी पोलिस तसेच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तक्रारदार महिलेला त्वरित अटक करा, अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जा, असा इशारा यावेळी मोर्चातील कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला.
मोर्चामध्ये गोव्यातील सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आझाद मैदानापासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मोर्चात कॅसिनोविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बिग डॅडी कॅसिनोजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चामुळे कॅसिनोसमोरील रस्ता पूर्णपणे जाम झाल्याने बराच वेळ कोंडी झाली होती.
'बिग डॅडी कॅसिनोकडून पदपथावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवताना ही तक्रारदार महिला अचानक येऊन कॅसिनोला पाठिंबा दर्शवते तसेच आमदार मोन्सेरात यांना शिवीगाळ करते. त्यांच्यासाठी अत्यंत हीन शब्दांचा वापर करते. सदर महिला इतके वाईट बोलूनही मोन्सेरात शांतपणे उत्तर देतात. मात्र ही महिला मोन्सेरात यांच्यावर खोटा आरोप करुन त्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करते. यामागे कॅसिनो लॉबीचा हात असल्याचे स्पष्ट होते. कॅसिनो विरोधात कारवाई केल्याने मोन्सेरात विरोधात ही खोटी तक्रार करण्यात आली. हा सारा प्रकार लज्जास्पद आहे. यावरुन सरकार कॅसिनो लॉबीचे की पणजीवासियांचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची त्वरीत दखल घेऊन कारवाई करावी',अशी मागणी आमदार फर्नांडिस यांनी यावेळी केली. तक्रारदार महिलेला अटक करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कुतिन्हो यांनी कॅसिनोचे अतिक्रमण हटवताना ही महिला त्याठिकाणी येते व आमदाराला शिवीगाळ करते यामागे कुठला हेतू आहे? यावरून या महिलेला कॅसिनो लॉबीने पुढे केले असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप केला. कॅसिनो हटवल्यास गोमंतकीय रोजगार गमावणार असे ही तक्रारदार महिला सांगत आहे. कॅसिनोमध्ये किती गोमंतकीय कामाला आहेत याची माहिती तिने येत्या 48 तासांत जाहीर करावी, असे आव्हान कुतिन्हो यांनी दिले आहे.
‘त्या’ महिलेविरुद्ध तक्रार
दरम्यान, आमदार बाबूश मोन्सेरात यांनी बिग डॅडी कॅसिनो तसेच तक्रारदार महिलेविरोधात पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कटकारस्थान रचणे, बदनामी करणे तसेच मुद्दामहून अपमान करणे या कलमांखाली मोन्सेरात यांनी ही तक्रार पणजी पोलिसांत दाखल केली आहे. तक्रारदार महिलेने आपल्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे तिने आपल्याविरोधात दाखल केलेली विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचेही मोन्सेरात यांनी या तक्रारीत नमूद केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement