Go First flights: 'गो फर्स्ट' जमिनीवरच! 9 मे पर्यंतची सर्व विमान उड्डाणे रद्द, प्रवाशांना मनस्ताप
Go First flights Cancelled: गो फर्स्ट एअरलाइन्सने 9 मेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. उड्डाणं रद्द केल्यानंतर डीजीसीएने गो फर्स्टला प्रवाशांचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे आदेश दिले आहेत.
Go First Flights: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट (GoFirst) एअरलाइन्सने आता 9 मेपर्यंत आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एअरलाइन्सने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ऑपरेशनल कारणांमुळे गो फर्स्टने (GoFirst) 9 मे 2023 पर्यंतची आपली उड्डाणं रद्द केल्याचं म्हटलं आहे. उड्डाणं रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल विमान कंपनीने खेद व्यक्त केला आहे. एअरलाइन्सने म्हटले आहे की, प्रवाशांना मूळ पेमेंट मोडद्वारे रकमेचा पूर्ण परतावा लवकरच दिला जाईल.
गो फर्स्टने (GoFirst) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आल्यामुळे तुमच्या प्रवास नियोजनावर परिणाम झाला आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे सहाय्य करण्यास तयार आहोत.
Due to operational reasons, Go First flights until 9th May 2023 are cancelled. We apologise for the inconvenience caused and request customers to visit https://t.co/qRNQ4oQjYT for more info. For any queries or concerns, please feel free to contact us. pic.twitter.com/mr3ak4lJjX
— GO FIRST (@GoFirstairways) May 4, 2023
गो फर्स्टने (GoFirst) यापूर्वी 3 मेपासून तीन दिवसांसाठी विमानाची उड्डाणं रद्द केली होती. मात्र ही मुदत वाढवून विमान कंपनीने 9 मेपर्यंत उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्टीचा महिना असल्याने देशांतर्गत विमान प्रवास वाढला आहे. प्रवाशांची देशांतर्गत प्रवासाला पसंती मिळत असतानाच विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणं रद्द केली आहेत.
याआधी गो फर्स्टने (GoFirst) NCLT कडे (National Company Law Tribunal) धाव घेतली होती, पण तिथूनही कंपनीला निराशा मिळाली. एनसीएलटीने (NCLT) गो फर्स्टच्या (GoFirst) याचिकेवर सुनावणी करताना, आयबीसी (ICB) अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे DGCA (Directorate General of Civil Aviation) ने गो फर्स्टला (GoFirst) उड्डाणे रद्द केल्यानंतर प्रवाशांना लवकरात लवकर पैसे परत करण्यास सांगितले आहे.
त्यानंतर गो फर्स्टने (GoFirst) DGCA ला माहिती दिली की, विमान कंपनीने 15 मेपर्यंत तिकिटांची विक्री थांबवली आहे. त्यामुळे, गो फर्स्टची (GoFirst) उड्डाणं 15 मेपर्यंत रद्द असू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
उड्डाणं रद्द करण्याचं 'हे' कारण
अहवालानुसार, गो फर्स्ट एअरलाईन्सला अनेक दिवसांपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोख रकमेअभावी कंपनी तेल कंपन्यांची थकबाकीही भरण्यास सक्षम नाही, त्यामुळे कंपन्यांनी गो फर्स्टला इंधन देण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत, गो फर्स्टने (GoFirst) सर्व उड्डाणं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:
Delhi: दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा; नेमकं कशामुळे झाली बाचाबाची?