(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Giriraj Singh on India Pak Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याबाबत गिरीराज सिंह यांचं मोठं वक्तव्य!
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे की, जम्मू -काश्मीरमध्ये हिंदूंवर होणारे हल्ले पाहता, येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
Giriraj Singh Statement on India vs Pakistan Match: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आज जोधपूर येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या घरी शोकसभेला हजेरी लावली. त्यानंतर जाताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान गिरीराज सिंह म्हणाले की, अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ नये, यावर पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, "दहशतवादाचा चेहरा आता स्पष्ट होईल. येत्या काळात भारताच्या मातीतून काँग्रेसचे नाव साफ होईल. जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेले हल्ले पाहता, येत्या काही दिवसांत होणाऱ्या भारत पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण, संबध अजून चांगले नाहीत."
यावेळी गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "काँग्रेस देशात चुकीचे राजकारण करत आहे. राजस्थानमध्ये वाल्मिकी समाज, एससीएसटी लोकांवर अत्याचार होत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत आणि काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करून मारले जात आहे या विषयावर काहीही न बोलता लखीमपूर घटनेवर राजकारण केले जात आहेत.
यापूर्वी गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर राजकारण केल्याचा आरोप केला होता
यापूर्वीही गिरीराज सिंह यांनी शनिवारी म्हटले होते की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा लखीमपूर खेरी दौरा हा 'राजकीय पर्यटन'चे उदाहरण आहे. पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी बोलताना सांगितले, की 'लखीमपूर खेरीला भेटायला गेलेल्या राहुल गांधींमध्ये खरी सहानुभूती आणि करुणा नाही. जिथे जिथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना संधी मिळेल तिथे ते त्यांचे राजकीय दौरे करून पुढे जातात. राहुल गांधी त्या घटनेत मारल्या गेलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला भेटायला का गेले नाहीत, हे मला विचारायचे आहे. काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते घाटीत का गेले नाहीत? विशेष म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.