Congress : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान, पक्षाचे निर्णय राहुल गांधींचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी घेतात; गुलाम नबी आझादांचा आरोप
Ghulam Nabi Azad Quit Congress: राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व गेल्यापासून पक्षाला अनेक निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्याचं गुलाम नबी आझादांनी म्हटलं आहे.
![Congress : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान, पक्षाचे निर्णय राहुल गांधींचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी घेतात; गुलाम नबी आझादांचा आरोप Ghulam Nabi Azad Quit Congress Allegation on Rahul Gandhi Insults of senior leaders Congress : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान, पक्षाचे निर्णय राहुल गांधींचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी घेतात; गुलाम नबी आझादांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/c3efa86e0c21f8f2889f2b8f6fc7ad2a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: एकीकडे अनेक राज्यातील सत्ता गमावत असलेल्या काँग्रेसला (Congress) आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केला आहे. राहुल गांधींचे पीए आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी हे आता पक्षासंबंधी निर्णय घेत आहेत, तसेच राहुल गांधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत असल्याचा आरोप करत गुलाम नबी आझादांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना एक पत्र लिहून हे आरोप केले आहेत.
काँग्रेस जोडो यात्रा सुरु करा
गुलाम नबी आझाद यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, "अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचं माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने 'भारत जोडो' यात्रा काढण्यापूर्वी 'काँग्रेस जोडो यात्रा' काढावी.
राहुल गांधी यांचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी निर्णय घेतात
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व आल्यापासून पक्षाचा पराभव होत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. पक्षाचे निर्णय हे ज्येष्ठ नेते किंवा वर्किंग कमिटी घेत नसून राहुल गांधी यांचे पीए आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जातोय
काँग्रेसमधील चर्चेची प्रक्रिया आता बंद झाली असून कोणताही निर्णय राहुल गांधींच्या मर्जीतल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्या नेत्यांकडून घेतले जातात असा आरोप गुलाम नबी आझादांनी केला आहे. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारलं जात असून त्यांचा अपमान केला जात असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. डॉ. मनममोहन सिंह यांच्या काळातील अध्यादेश फाडणे हे राहुल गांधींच्या अपरिपक्वतेचं लक्षण असून त्यांनी वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला. यूपीए सरकारचा रिमोट कंट्रोल मॉडेल आता काँग्रेसमध्येही लागू झालं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुलाम नबी आझाद यांची नाराजी का आहे?
गुलाम नबी आझाद बराच काळ काँग्रेसवर नाराज होते असं सांगितलं जातंय. काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या G-23 गटातही त्यांचा सहभाग होता. G-23 गट सातत्याने काँग्रेसमध्ये अनेक बदलांची मागणी करत आहे. प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच गुलाम नबी आझाद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची नाराजी समोर आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने आझाद यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीचं कारण देत गुलाम नबी यांनी काही तासातच पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)