Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद राजकारणातून संन्यास घेणार? एका कार्यक्रमात बोलताना दिले संकेत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तसे संकेत दिले आहेत.
Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad )पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एका काय्कर्मात बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर ते कधीही राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाच राज्यात काँग्रेसच्या परभावानंतर नुकतीच काँग्रेसच्या G-23 नेत्यांच्या बैठक झाली. यानंतर गुलाम नबी आझाद चर्चेत आले आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. या कामगिरीबद्दल गुलाम नबी आझाद यांचा सन्मान करण्यासाठी रविवारी जम्मू-काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशन आणि ज्येष्ठ वकील एमके भारद्वाज यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये बोलताना आझाद म्हणाले की, 'समाजात बदल घडवून आणायचा आहे. कधी कधी वाटतं, मी निवृत्त होऊन समाजसेवेत गुंतलोय हे अचानक ऐकायला मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही'. आझाद यांनी असं वक्तव्य केल्यानं ते राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात गुलाम नबी आझाद यांनी येथे 35 मिनिटे भाषण केले. मात्र, राजकारणावर बोलणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. ते म्हणाले की, 'भारतातील राजकारण इतके बिघडले आहे की, आपण माणूस आहोत की नाही अशी शंका अनेकवेळा येत असल्याचे ते म्हणाले.
गुलाम नबी यांचा राजकीय प्रवास
गुलाम नबी आझाद यांनी 1973 मध्ये काँग्रेसचे सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1973-1975 मध्ये ते ब्लेस्सा काँग्रेस कमिटीचे ब्लॉक सचिव होते. 1975 मध्ये ते जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर 1977 मध्ये आझाद दोडा जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीसही बनले. 1982 मध्ये, गुलाम नबी आझाद यांनी पहिले केंद्रीय उपमंत्री म्हणून कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. 1985 मध्ये गुलाम नबी आझाद गृह राज्यमंत्री झाले. पी.व्ही नरसिंह राव सरकारमध्ये गुलाम नबी आझाद यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि नंतर पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मनमोहन सिंग सरकारमध्येही ते मंत्री होते. 2007 मध्ये त्यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती.