भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता केसीआर सरसावले
K. Chandrashekar Rao: या महिन्यात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी एकहाती भाजपला रोखले तसा प्रकार या राज्यांमध्ये होताना दिसणार नाही.
K. Chandrashekar Rao : या महिन्यात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी एकहाती भाजपला रोखले तसा प्रकार या राज्यांमध्ये होताना दिसणार नाही. कारण या राज्यांमध्ये कुठल्याही एका पक्षाची सत्ता हस्तगत करता येईल एवढी ताकद नाही. त्यातच शिवसेना, आप, तृणमूल काँग्रेस, कॅप्टन अमरिंदर यांचा नवा पक्ष, शेतकरी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेनेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले असल्याने अनेक पक्ष एकाच वेळी मैदानात आहेत. भाजपला हरवायचे तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळेच म्हणतायत. पण या पाच राज्यांच्या निवडणुकीत मात्र विरोधकांच्या एकीचे चित्र दिसत नाहीय. याचा अर्थ प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे लक्ष स्वतःची ताकद वाढवून दिल्ली काबिज करण्याकडे आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यात वावगे काही नाही.
पण केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी तरी विरोधक एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झालेलाच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसरी आघाडी आहेच कुठे असे म्हणत थेट काँग्रेसवर निशाणा साधला होता. तर ज्या ममतांची साथ घेण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेने ठरवले होते त्यांनी मात्र काँग्रेस वगळून आघाडी करणार नाही असे स्पष्ट केले. पण याच काँग्रेसने गोव्यात मात्र शिवसेना-राष्ट्रवादीची युती करण्यास नकार दिलाय. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे की ममता बॅनर्जी कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांनीही उडी घेतलीय. केंद्रात स्वतःचे प्रस्थ निर्माण करण्यासाठी अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी यापूर्वीही प्रयत्न केलेत. त्यापैकी किती जण यशस्वी झाले तो इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे.
दोन दिवसांपूर्वी तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असल्याने संविधानात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. आणि यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्याची गरज असल्याचे म्हटले होते. यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र ही पंतप्रधानपदासाठी लढाई नसून देशात बदल घडवण्यासाठी लढाई असल्याचे म्हणण्यासही ते विसरले नाहीत. विशेष म्हणजे दक्षिणेकडील नेते हिंदीपासून दूर असतात, पण केसीआर यांनी मात्र देशभरातील माध्यमांची गरज लक्षात घेऊन पत्रकार परिषदेत हिंदीत संवाद साधला होता.
केसीआर हे तेलगू देशम पार्टीचे सदस्य होते. पण तेलंगण राज्याच्या मागणीसाठी त्यांनी तेलगू देशम सोडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली आणि आंदोलन सुरु केले. २००४ मध्ये त्यांनी काँग्रेससोबत लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यांचे ५ खासदार निवडून आले होते. ते यूपीएमधील घटक पक्षही होते. पण तेलंगणा राज्याची निर्मिती न झाल्याने त्यांनी यूपीएतून बाहेर पडण्य़ाचा निर्णय़ घेतला होता. त्यानंतर ते भाजपच्या जवळ गेल्याचं म्हटलं जात होतं.
केसीआर यांच्या या वक्तव्यामुळे त्यामुळेच अनेकांना आश्चर्य वाटले होते. कारण केसीआर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच हेलिकॉप्टरमधून एका कार्यक्रमाला उपस्थितही राहाणार आहेत. पण पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी म्हणजे २०१८ मध्ये मोदींवर टीकास्त्र सोडले होते. हा देश तुमच्या आजोबा किंवा वडिलांची जहागीर नाही अशी टीका त्यांनी केली होती. ही टीका त्यांनी तेलंगणातील आदिवासी आणि मुस्लीम समाजाचे आरक्षण मोदींनी वाढवून न दिल्यानं केली होती.
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासोबत आता केसीआरही विरोधकांची मोट बांधून २०२४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेत. त्यांना काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आपची कशी मदत मिळते ते येणाऱ्या काही दिवसांमध्येच समजेल. पण एक मात्र खरे की शरद पवार, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंना केसीआर यांच्या रुपात आणखी एक प्रतिस्पर्धी निर्माण झालाय.