(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 लाख कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री
कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या विमा कवच मिळणार आहे. तसंच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवरील मरगळ झटकण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वैद्यकीय कर्मचारी, गरीब, महिला, वयोवृद्ध यांच्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या विमा कवच मिळणार आहे. तसंच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1.70 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
गरिबांसाठी काय? सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी सरकारने व्यवस्था केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे दोन प्रमुख भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरिबांना कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना 5 किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याचा फायदा 80 कोटी लोकांना होणार आहे. याशिवाय एक किलो डाळ मोफत मिळणार आहे.
योजनेअंतर्गत आठ विभागांमध्ये शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा-निवृत्त कर्मचारी-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला योजना, सेल्फ हेल्प ग्रुप (महिला), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स (EPFO),कन्स्ट्रक्शन वर्कर्स यांना डीबीटीला फायदा मिळणार आहे. वयोवृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पुढील तीन महिन्यात 1000 रुपये दोन हफ्त्यात दिले जाणार आहेत.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांची काळजी घेणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आभार मानले. अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोनाच्या लढाईत आघाडीवर लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचं कवच सरकार देणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, इतर वैद्यकीय कर्चाऱ्यांचा समावेश आहे. याचा फायदा 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
8.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्यात आठवड्यात 2000 रुपयांचा हफ्ता दिला जाईल, जेणेकरुन तातडीने फायदा मिळायला सुरुवात होईल.
देशात मनरेगा योजनेचा फायदा पाच कोटी कुटुंबांना मिळतो. मनरेगाचे मजुरी आता 182 रुपयांनी वाढवून 202 रुपये करण्यात आली आहे.
जनधन योजनेत सुमारे साडे 20 कोटी महिलांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांपर्यंत डीबीटीद्वारे प्रत्येक महिन्यात 500 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत.
सुमारे 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गंत 3 महिन्यांपर्यंत मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
ज्या कंपन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यामधील ₹15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्याचा पीएफ पुढील तीन महिने सरकार भरणार आहे. 80 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा, देशातील 20 लाख कर्मचाऱ्यांना फायदा - पुढील तीन महिने प्रति व्यक्तीला प्रति महिना पाच किलो तांदूळ, गहू आणि एक किलो डाळ मोफत देणार - जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पुढील तीन महिने पाचशे रुपये टाकणार - उज्ज्वला योजना अंतर्गत पुढील तीन महिने मोफत सिलेंडर - वयोवृद्ध, विधवा, अपंग यांना पुढील तीन महिने एक हजार रुपये - ज्या कंपन्यांमध्ये कमाल 100 कर्मचारी आहेत, त्यामधील ₹15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्याचा पीएफ पुढील तीन महिने सरकार भरणार