लष्करी अधिकारी असल्याचं सांगत केलं पाच जणींशी लग्न, नोकरी लावतो म्हणत अनेकांना फसवलं
तोतया लष्करी अधिकाऱ्याने पाच जणींशी विवाह करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या इसमाने दहा शहीद जवानांच्या पत्नींकडून पेन्शन देतो म्हणून पैसे उकळले तसेच सैन्यात नोकरी लावतो म्हणून देखील अनेकांची फसवणूक केलीय.
![लष्करी अधिकारी असल्याचं सांगत केलं पाच जणींशी लग्न, नोकरी लावतो म्हणत अनेकांना फसवलं Fake Army Officer Arrested In Belgaum deceived many People and Married to five Women लष्करी अधिकारी असल्याचं सांगत केलं पाच जणींशी लग्न, नोकरी लावतो म्हणत अनेकांना फसवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/09175440/fake-army-officer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करून पाच जणींशी लग्न करणाऱ्या तसेच पेन्शन मिळवून देतो म्हणून शहीद जवानांच्या पत्नींची फसवणूक करणाऱ्या आणि सैन्यात नोकरी लावतो म्हणून तरुणांची फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला कॅम्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कॅम्प विभागात लष्करी गणवेश परिधान करून संशयास्पदरित्या वावरत असलेल्या व्यक्तीला पकडून लष्कराने कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याचे बिंग फुटले. तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव मंजुनाथ बिरादार असे असून तो विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड गावातील आहे.
लष्करात सुभेदार मेजर असल्याची बतावणी करून त्याने पाच जणींशी विवाह केला दहा पेक्षा अधिक शहीद जवानांच्या पत्नींना वन रँक वन पेन्शन देतो म्हणून पैसे उकळले. तसेच अनेक जणांना सैन्यात नोकरी लावतो म्हणून हजारो रुपये घेतल्याचे पोलीस चौकशीत त्याने कबूल केले आहे.
एखाद्या गावात लष्करी गणवेशात रुबाबात जायचे आणि गावातील प्रमुख मंडळींची भेट घेऊन त्यांच्यावर छाप पाडायची. नंतर मी अनाथ आहे असे सांगून मला लग्न करायचे आहे असे सांगत असे. नंतर गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार झोडून मंजुनाथ अचानक एक दिवस गायब होत असे. तसेच गावातील शहीद कुटुंबाचा जाहीर सत्कार करून त्यांच्याशी ओळख वाढवून वन रँक वन पेन्शन मिळवून देतो असे सांगून दहा शहीद जवानांच्या पत्नींकडून त्याने पैसे उकळले आहेत. याशिवाय सैन्यात नोकरी लावतो म्हणून देखील पैसे घेऊन अनेकांना मंजुनाथ याने टोप्या घातल्या आहेत. सध्या कॅम्प पोलीस कसून मंजुनाथची चौकशी करत आहेत. लष्करी गणवेशात कॅम्प विभागात फिरत असताना सापडल्याने कॅम्प पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)