फेसबूक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख आंखी दास यांचा राजीनामा
काही दिवसांपूर्वी आंखी दास या डेटा सुरक्षा विधेयक 2019 संबधित संसदेने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीसमोर हजर झाल्या होत्या.

नवी दिल्ली : फेसबूक इंडियाची पब्लिक पॉलिसीच्या प्रमुख आंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकने याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आंखी दास या डेटा सुरक्षा विधेयक 2019 संबधित संसदेने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीसमोर हजर झाल्या होत्या. भाजप खासदार मिनाक्षी लेखी या समितीच्या अध्यक्ष आहेत.
सोशल मीडिया साइटचा कथित गैरवापर केल्याबद्दल फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन हे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती आणि तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले होते. मोहन यांनी सांगितलं होतं की, कंटेंटसाठी आमचे निष्पक्ष नियम आहेत. हे कम्युनिटी स्टँडर्ड्सचे काटेकोरपणे पालन करते. ते म्हणाले, की संपूर्ण जगात आम्ही हिच पॉलिसी लागू करतो. यात कोणतीही परिस्थिती, धार्मिक किंवा सांस्कृतिक विश्वासाची पर्वा करत नाही. आम्ही नेत्यांद्वारे करण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्ट हटवल्या आहेत आणि पुढेही हटवण्यात येत राहिल.
देशाचं राजकारण तापवणारं भाजप-फेसबुक प्रकरण नेमकं काय आहे?
गेल्या काही दिवसांत फेसबुकवर हेट स्पीच आणि राजकीय पक्षपाताचा आरोप झाला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकन वृत्तपत्राच्या आधारावर एक ट्वीट केलं होतं. यामध्ये फेसबुक भारतात कशाप्रकारे हेट स्पीच विरोधात कारवाई करत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर भाजप आणि कॉंग्रेस या मुद्द्यावरून समोरासमोर आले होते.
पक्षपातीपणाच्या आरोपानंतर फेसबुककडून स्पष्टीकरण; आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही
फेसबुकनेही या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली होती. फेसबूकने म्हटलं होतं की. फेसबूक हेट स्पीचबाबतच्या कारवाईबाबत सतर्क आहे. फेसबुक पॉलिसीमध्ये कोणताही पक्ष, कोणताही धर्म पाहिला जात नाही आणि निष्पक्षतेने काम केलं जातं.























