Flight Emergency Landing: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे भोपाळमध्ये विमान उतरवले
Flight Emergency Landing: विमानातील तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विमानाचे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
Flight Emergency Landing: बंगळूरुमध्ये (Banglore) विरोधी पक्षांची बैठक (Opposition Meeting) आटोपून दिल्लीला परत जात असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचे भोपाळमध्ये एमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing ) करण्यात आले आहे. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने भोपाळमधील राजा भोज विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले आहे. सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) मंगळवार (18 जुलै) रोजी चार्टर्ड विमानाने बंगळूरमधून दिल्लीला परत जात होते.
विमानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भोपाळच्या विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले.
विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये झाले होते सहभागी
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सोमवारी बंगळूरमध्ये सुरु झालेल्या दोन दिवसीय बैठकीसाठी हजेरी लावली. मंगळवारी ही बैठक समाप्त झाली. या बैठकीत 26 राजकीय विरोधी पक्ष सहभागी झाले. विरोधी पक्षांच्या या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच INDIA असं नाव देण्यात आलं आहे.
#WATCH | Congress leaders Sonia Gandhi and Rahul Gandhi at Bhopal airport after their aircraft made an emergency landing at the airport pic.twitter.com/4mDdRG37bZ
— ANI (@ANI) July 18, 2023
राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपविरोधात रणनिती आखण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यामध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं की आता लढाई ही इंडिया आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात असणार आहे. यामध्ये कोण विजयी होईल हे सांगायची गरज नाही.
विरोधकांची पुढची बैठक ही मुंबईत होणार आहे. यावर बोलतांना राहुल गांधी यांनी म्हटलं की, आम्ही आमचा कामाचा अजेंडा ठरवला आहे. आम्ही आमच्या विचारधारेसाठी आणि देशासाठी जे करणार आहोत त्याची माहिती तुम्हाला मुंबईत देण्यात येईल. बैठकीसाठी 11 सदस्यांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पार पडलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला.
भाजपविरोधात लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. तसेच या बैठकीमध्ये निवडणुकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. पण आता मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.