Sharad Pawar : इकडं शरद पवारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली अन् तिकडे निवडणूक आयोगाने...
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी लोकसभा अध्यक्षांची आज भेट घेतली.
Sharad Pawar : आपल्या पक्षाच्या खासदाराची खासदारकी जाऊ नये यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले. खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammed Faizal) यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात यावी, यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. तर, दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्षद्वीप लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर स्थगिती दिली आहे. दिल्लीतील या टायमिंगची सध्या चर्चा सुरू आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्षद्वीपसाठी जाहीर करण्यात आलेली पोटनिवडणूक स्थगित केली आहे. लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूकही रोखली आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी.एम. यांचे जावई मोहम्मद सलीह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार फैजल यांना लक्षद्वीपमधील न्यायालयाने दोषी ठरवले होते. कोर्टाने फैजल आणि इतर आरोपींना दंडात्मक आणि कारावासाची शिक्षा सुनावली होती. फैजल यांना दोन वर्षांहून अधिक काळाची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार होती.
लोकसभा सचिवालयाने मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर 18 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्षद्वीपसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या ठिकाणी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते.
As the Kerala High Court suspended the conviction & sentence of the former Lakshadweep MP and hence we appealed to the Honourable speaker to consider the matter of suspension. pic.twitter.com/nlthklArtM
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 30, 2023
10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा
लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 2009 मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
कोण आहेत खासदार मोहम्मद फैजल
मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. मोहम्मद फैजल हे 2014 मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभा खासदार म्हणून 16 व्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आले होते. 2014-2016 या कालावधीत ते परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.
इतर महत्त्वाची बातमी: