Manish Sisodia : CBI छाप्यानंतर लूक आउट नोटीस आणि आता ईडीचा फेरा? मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढणार
Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
Manish Sisodiya : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या (Manish Sisodia) अडचणीत वाढ होत चालली आहे. मनिष सिसोदिया यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आल्यानंतर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मनिष सिसोदिया यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर सीबीआयने ईडीकडे (ED) महत्त्वाची कागदपत्रे सोपवली आहेत.
सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली आहे. त्यामुळे सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याआधी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले होते. यामध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.
मनिष सिसोदिया यांनी लुक आउट नोटीसबाबत बोलताना म्हटले की, सीबीआयला छाप्यामध्ये माझ्याविरोधात काहीही आढळले नाही तर त्यांनी लुक आउट नोटीस जारी केली. मोदीजी यांनी छापा टाकण्याऐवजी महागाई आणि बेरोजगारीवर विचार करण्याची आवश्यकता आहे. सीबीआयला माझ्या घरातून एक रुपयादेखील मिळाला नाही. कार्यालयीन कामकाजाच्या फाइल्स घेऊन गेले आहेत.
मद्य विक्रीच्या धोरणात कोणताही घोटाळा झाला नाही. या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरजच नसल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. भाजपला आणि मोदी यांना घोटाळ्याची चिंता असती तर गुजरातमधील बेकायदेशीर दारु विक्रीची चौकशी केली असती. अरविंद केजरीवाल यांना रोखण्यात त्यांना रस असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.
मद्य घोटाळ्यात शुक्रवारी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय इतरही सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी सुरू होती. जवळपास 14 तास छापेमारी सुरू होती. या छाप्यात सीबीआयने काही महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त केले होते. यातील काही दस्ताऐवज अतिशय गोपनीय होते. हे दस्ताऐवज सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी असता कामा नये. सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या कारची तपासणीदेखील केली होती. सीबीआयने सिसोदिया यांचा फोन, लॅपटॉप जप्त केला. त्याशिवाय त्यांचा ई-मेल डेटादेखील सुरक्षित ठेवला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: