Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोन दिसले, BSF कडून गोळीबार
आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्राच्या अरनिया सेक्टरच्या आरएस पुराजवळ ड्रोनची हालचाल दिसली.
Jammu Kashmir : पाकिस्तान (Pakistan) भारताविरोधात (India) नवनवीन कट रचत असतो. सीमेवर अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने ड्रोनने हल्ले (Drone Attack) करण्याचा प्रयत्न करत आहे. आजही जम्मू-काश्मीरचे आर.एस.पुरा आणि अरनिया सेक्टर भागात ड्रोन दिसले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला.
आर एस. पुरा, अरनिया सेक्टरजवळ ड्रोनच्या हालचाली
बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्राच्या अरनिया सेक्टरच्या आरएस पुराजवळ ड्रोनची हालचाल दिसली. बीएसएफने 10 ते 20 राउंड गोळीबार केल्यानंतर ड्रोन परत आले. या संदर्भात शोध मोहीम सुरू आहे."
या भागात निमलष्करी दलांकडून शोध घेतला जात आहे, परंतु अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही, असे अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, ड्रोन सर्वप्रथम आर.एस. पुरा सेक्टरमध्ये पाहिले, परंतु त्याच्यावर गोळीबार केल्यानंतर तो अरनिया सेक्टरमध्ये गेला आणि शेवटी सीमेच्या पलीकडे परत गेला.
पाकिस्तानच्या आरडीएक्स आणि बॉम्बस्फोटच्या तस्करीचा मोठा कट उधळला
या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या आरडीएक्स आणि बॉम्बस्फोटांच्या तस्करीचा मोठा कट उधळण्यात आला होता. पंजाबमधील (Punjab) गुरदासपूरच्या पंजग्रेन भागात बीएसएफने (BSF) पाकिस्तानी सीमेजवळ (India-Pakistan border) ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला होता. यानंतर ड्रोन (drone attack) पुन्हा पाकिस्तानी सीमेवर गेले. पंजाबमधील निवडणुकांपूर्वी (punjab election 2022) आरडीएक्स (RDX) आणि बॉम्बस्फोटकांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा मोठा कट ड्रोनद्वारे उधळला गेला होता.
ड्रोनमधून पडली दोन पाकिटे
पंजाबच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये, बीएसएफने सुमारे 5 किलो आरडीएक्स आणि डिटोनेटरसह मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा गुरदासपूर सेक्टरमधील पंजग्रेन भागात पाकिस्तान सीमेवरील काटेरी तारांजवळ ड्रोनचा आवाज ऐकू आला. अलर्ट बीएसएफ जवानांनी ड्रोनवर तात्काळ गोळीबार केला, त्यानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानी सीमेवर गेला, मात्र त्यापूर्वीच दोन पाकिटे काटेरी तारांजवळील शेतात फेकून देण्यात आली. स्निफर डॉगच्या मदतीने बीएसएफ जवानांनी दोन्ही पाकिटे जप्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: