(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi To London Bus: काय सांगता, बसने करता येणार दिल्ली ते लंडन प्रवास!
Delhi to London Bus Service : दिल्ली ते लंडन दरम्यन बसने प्रवास करता येणार आहे. 18 देशांमधून ही बस प्रवास करणार आहे.
Delhi to London Bus Service : जगातील अनेकांना भटकंती करण्याचे वेड असते. या वेडातून अनेकजण विविध देशांमध्ये पर्यटनासाठी जातात. सध्या भारताकडूनदेखील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. भारत-म्यानमार दरम्यानचे संबंध सुरळीत होत असून दोन्ही देशांमधील वाहतूक सुरू होत आहे. त्यानंतर आता देशातील सर्वात लांबीच्या प्रवासासाठीच्या बससेवेसाठी विचार केला जाऊ शकतो. दिल्ली ते लंडन दरम्यान बस सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रवास जवळपास 20 हजार किलोमीटरचा असणार आहे.
15 लाख रुपयांचा खर्च
सध्या 20 हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागणार आहे. भटकंतीची आवड असलेले लोक अनेक देशांच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. माहितीनुसार, या बससेवेचा आनंद घेण्यासाठी 15 लाखांपर्यंत खर्च येणार आहे. सध्या ही रक्कम तुम्हाला जास्त वाटत असली तरी या 15 लाखांमध्ये तुमच्या बसच्या भाड्यापासून ते सर्व देशांमध्ये राहण्याची व्यवस्था, त्यांच्या व्हिसाचीही व्यवस्था होणार आहे. बसमध्ये 20 जागा असतील आणि प्रत्येक प्रवाशाला त्यांची केबिन असेल. यामध्ये जेवण, पिणे, झोपण्याची सुविधा यासह सर्व सुविधा असणार आहेत.
18 देशांना भेट देण्याची संधी
ही बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना या बससेवेच्या मार्गात येणार्या 18 देशांचा प्रवासही करता येणार आहे. ज्यामध्ये भारत, म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमधून बस प्रवास करणार आहे.
यापूर्वीही बसने गाठता येत होतं लंडन
दिल्ली आणि लंडन दरम्यान बससेवेचे नियोजन ही देशातील सर्वात मोठी आणि पहिली बस सेवा नाही. सुमारे 72 वर्षांपूर्वी कोलकाता ते लंडन दरम्यान बससेवा चालवली जात होती. या बससेवेचा एक प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 45 दिवस लागायचे. ही बससेवा स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिली होती. अखेर ही बससेवा 1973 मध्ये बंद करण्यात आली.