Delhi : खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, फी महिन्याला भरण्याची मुभा; दिल्ली सरकारचा निर्णय
दिल्ली सरकारने (Delhi Govt.) खासगी शाळांच्या (Private school) फीमध्ये 15 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय लागू केला आहे. तसेच एकत्रित तीन महिन्याची फी जमा करण्याचीही आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : जर आपले पाल्य दिल्लीच्या शाळेत शिकत असेल तर या कोरोनाच्या संकट काळात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण दिल्ली सरकारने राज्यात उच्च न्यायालयाचा निर्णय लागू केला असून त्यामुळे खासगी शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी होणार आहे. हा निर्णय 2020-21 सालच्या शैक्षणिक सालापासून लागू करण्यात येणार आहे. तसेच तीन महिन्यांची फी एकत्रित भरण्याचीही आवश्यकता नसून त्यासाठी प्रत्येक महिन्याला फी भरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. दिल्ली सरकारचा हा निर्णय 460 खासगी शाळांना लागू होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या आधी फी भरली असेल त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फी मधील 15 टक्के रक्कम शाळांनी परत द्यावा असा आदेशही दिल्ली सरकारने दिला आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या महामारीने भरडलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीतील 460 खासगी शाळांना आदेश लागू
जर आर्थिक परिस्थितीमुळे एखाद्या पालकांनी फी भरली नाही तर संबंधित विद्यार्थ्याला शाळेतील कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे. दिल्ली सरकारचा हा निर्णय 460 खासगी शाळांना लागू होणार आहे.
दिल्ली सरकारने या आधी एक आदेश जारी करुन सर्व खासगी शाळांना वार्षिक आणि डेव्हलपमेंट फी घेण्याला बंदी घातली होती. दिल्ली सरकारच्य या निर्णयाविरोधात 460 खासगी शाळांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या शाळांना वार्षिक आणि डेव्हलपमेंट फी घ्यायला मान्यता दिली आहे. पण त्या 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी खासगी शाळांनी 15 टक्के फी कपात करावी असा आदेशही दिला होता.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामान्य लोकांचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने फी कपातीचा चांगला निर्णय घेऊन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली सरकारचा हा निर्णय इतर राज्यांनीही लागू केला तर निश्चित स्वरुपात तो एक चांगला निर्णय असेल.
महत्वाच्या बातम्या :