Thane : गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करा, ठाण्यातील गणेश मंडळांची राज्य सरकारकडे मागणी
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवारी गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत नियमावली जाहीर केली. त्याला ठाण्यातील जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने विरोध केला आहे.
ठाणे : राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा सुपुत्र या नात्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर येत्या काही दिवसात ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा समितीने दिला आहे.
कोविडचा प्रादुर्भाव पाहता याही वर्षी गणेश भक्तांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा यासाठी मंगळवारी राज्य सरकारने सूचनावली जाहीर केली. यात मूर्तीची उंची , देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे.
या प्रकरणी सर्व मंडळांशी सहमतीने या निर्णयाबाबत चर्चा करुन पुढील निर्णय लवकरच घेऊ, असंही या समितीने सांगितले. गणेशभक्तांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या निर्णयावर फेरविचार करावा, असे मत समिती अध्यक्ष समीर सावंत यांनी व्यक्त केले. गुरुवारी रात्री उशिरा ऑनलाइन झालेल्या बैठकीत या नियमांचं निषेध करण्यात आला. त्यामुळे यावर महापालिका प्रशासन आणि राज्य प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे सर्व गणेशभक्त आणि मूर्तिकारांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मोठी बातमी... मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 9,195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मालेगावात रुग्णसंख्या शुन्यावर
- ABP Majha Exclusive : 'अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात', स्वीय सचिव पलांडेंची कबुली, कारवाईचा तपशील माझाच्या हाती