(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Oxygen Crisis: 'ही लाट नव्हे तर त्सुनामी! ऑक्सिजन पुरवठ्याला अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू', उच्च न्यायालयाचा संताप
दिल्ली हायकोर्टनं संताप व्यक्त करत म्हटलं आहे की, ही कोविडची लाट नाही तर सुनामी आहे. ऑक्सिजन पुरवठ्याला जर कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना आम्ही फासावर लटकवू, असं हायकोर्टानं म्हटलंय.
नवी दिल्लीः देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. काही राज्य कोरोनाच्या संक्रमणानं अधिक बाधित झाली आहेत. यात दिल्लीचा देखील समावेश आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळं ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. आज दिल्ली हायकोर्टने आज ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हायकोर्टानं म्हटलं आहे की, ही कोविडची लाट नाही तर सुनामी आहे. ऑक्सिजन पुरवठ्याला जर केंद्र, राज्य तथा स्थानिक प्रशासनातला कुणी अधिकारी अडथळा आणत असेल तर त्यांना आम्ही फासावर लटकवू, असं हायकोर्टानं म्हटलंय.
जस्टिस विपिन सांघी आणि जस्टिस रेखा पल्ली यांच्या बेंचनं हा संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटलनं ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कोर्टानं म्हटलं आहे ही, कोरोनाची ही दुसरी लाट आहे असं आपण म्हणत आहोत, पण खरंतर ही त्सुनामी आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला तयारीविषयी विचारणा केली. मे मध्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या शिखर गाठणार असून, केंद्र सरकारने मुलभूत आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी लस आणि ऑक्सिजन यांची काय तयारी आहे, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्द्यावरुन कोर्टानं दिल्ली सरकारला म्हटलं आहे की, ऑक्सिजन पुरवठा बाधित करणारे लोक कोण आहे. आम्ही त्या लोकांना फासावर लटकवू, आम्ही कुणालाही सोडणार नाही. कोर्टानं सांगितलं की, दिल्ली सरकार तथा स्थानिक प्रशासनानं अशा अधिकाऱ्यांबाबत केंद्राला देखील माहिती द्यावी, जेणेकरुन त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकेल.