दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीनं बोलावली गुप्तचर यंत्रणांची बैठक
सतर्कतेचा इशारा म्हणून देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुप्तचर यंत्रणांसह तातडीनं महत्त्वाची बैठकही केली.
दिल्ली : दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. यामध्ये तपास यंत्रणाही कामाला लागल्या असून केंद्रीय गृहखातंही सक्रिय झाल्याचं कळत आहे. स्फोटाबाबत माहिती मिळताच खुद्द अमित शाह यांनी गुप्तचर यंत्रणांच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना तात़डीनं एका बैठकीसाठी बोलावलं.
अमित शाह यांच्या या बैठकीमध्ये स्फोटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे अधिकारी पाहायला मिळाले. दरम्यान दिल्ली पोलीस सदर प्रकरणी तपास करत असून, त्यांनी शक्य तितक्या वेगानं या प्रकरणाच्या मुळाशी जावं असे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय गुप्तचर यंत्रणांनी शक्य त्या सर्व परिंनी दिल्ली पोलिसांची मदत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
शुक्रवारी दिल्लीत असणाऱ्या इस्रायली दूतावासाबाहेर कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट झाला. ज्यानंतर भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी इस्रायलच्या मीर बेन शब्बात यांच्याशी संवाद साधत त्यांना या स्फोटाबाबतची माहिती दिली. शिवाय सद्यस्थितीला भारताकडून उचलण्याच येणाऱ्या पावलांबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती शब्बात यांना दिली. तिथं देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही जबाबदारीचे निर्णय घेत इस्रायलचे अधिकारी आणि दूतावासाला पूर्ण संरक्षण देणार असल्याचा विश्वास देऊ केला.
एकिकडे देशात संरक्षणाच्या मुद्द्यावरुन काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल विश्वासार्हता दाखवली आहे.
मुंबईत हाय अलर्ट
दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या भीतीचं वातावरण आहे. तर, या घटनेनंतर सावधगिरी म्हणून मुंबईतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचीही कसून तपासणी केली जात आहे,