एक्स्प्लोर
हवालाचे कोट्यवधी रुपये परदेशात नेणाऱ्या हवाई सुंदरीला अटक
हवालाचे तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये हाँगकाँगला घेऊन जाणाऱ्या एका हवाई सुंदरीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : हवालाचे तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये हाँगकाँगला घेऊन जाणाऱ्या जेट एअरवेजच्या एका हवाई सुंदरीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)ने जेव्हा छापा मारला त्यावेळी या हवाई सुंदरीकडे चार लाख ऐंशी हजार डॉलर सापडले. ही हवाई सुंदरी हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाइटमधील क्रू मेंबर होती. तिच्यासोबतच दिल्लीतील एका हवाला एजंटलाही अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 8 जानेवारीला रात्री दिल्ली विमानतळावर हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाईटवर छापा मारण्यात आला. यावेळी यातील एका हवाई सुंदरीच्या बॅगेमध्ये लाखो डॉलर सापडले. हे डॉलर अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवले होते. या डॉलर्सचं भारतीय मूल्य तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये एवढं आहे.
या हवाई सुंदरीला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशीही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एका हवाला एजंटलाही ताब्यात घेतलं. ही हवाई सुंदरी हे पैसे परदेशात पोहचवण्याचे काम करत होती.
अटक केलेल्या हवाला एजंटचं नाव अमित मल्होत्रा असल्याची माहिती समजते आहे. तो एक ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा. ज्याच्यामार्फत त्यानं हवाला रॅकेट सुरु ठेवलं होतं.
सुत्रांच्या माहितीनुसार, ही हवाई सुंदरी मूळची देहरादूनची असून मागील सहा वर्षापासून ती एअरवेज क्षेत्रात आहे. तिला प्रत्येकी एका डॉलरमागे एक रुपया मिळायचा. म्हणजेच यावेळी तिने हाँगकाँगला 4 लाख 80 हजार डॉलर पोहचवले असते तर तिला तब्बल 4 लाख 80 हजार रुपये मिळाले असते.
डीआरआयच्या सुत्रांच्या माहितीनुसार, हवाई सुंदरीच्या पतीला तिच्या या संपूर्ण कारभाराबाबत कोणतीही माहिती नव्हती. पण पतीच्या मोबाइलमुळेच हवाला एजंट अमित पकडला गेला. हवाई सुंदरी पकडली गेल्यानं हवालाचे पैसे हाँगकाँगला पोहचले नाही. त्यामुळे अमितनं हवाई सुंदरीच्या पतीचा मोबाइल नंबर मिळवला. 'मी तुमच्या पत्नीकडे काही तरी सामान दिलं होतं. पण ते अद्याप पोहचलेलं नाही.' अशी तक्रार त्यानं तिच्या पतीकडे केली. हवाई सुंदरीच्या पतीनं ही माहिती तात्काळ डीआरआयला दिली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हवाई सुंदरीच्या मदतीनं अमितला एका ठिकाणी बोलावलं. ज्यानंतर तो अलगद त्यांच्या जाळ्यात अडकला.
अमित हा मागील वर्षभरापासून हवाला रॅकेट चालवत होता. त्याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याचा जवळजवळ 14 ते 15 व्यापाऱ्यांशी संपर्क होता. या व्यापाऱ्यांचा पैसा तो हवाला नेटवर्कच्या माध्यमातून परदेशात पाठवत होता. डीआरआय सध्या दोघांचीही कसून चौकशी करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement