Delhi Flood : दिल्लीत पुराचे पाणी कमी होत असताना सापांचा वाढता धोका; वनविभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी
Delhi Flood : दिल्लीचे वन आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वनविभागाला 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' स्थापन करण्यास सांगितले आहे.
Delhi Flood : दिल्लीत (Delhi) पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता सापांचा धोका वाढला आहे. दिल्लीचे वन आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय (Gopal Rai) म्हणाले की, पुराचे पाणी ओसरल्यानंतर यमुना नदीकाठच्या घरातून साप बाहेर पडण्याच्या तक्रारी, तसेच पूर मदत छावण्यांजवळ साप आढळून आल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन वनविभागाला रॅपिड रिस्पॉन्स टीम (Rapid Response Team) स्थापन करण्यास सांगितले आहे. या टीम सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम करतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच वनविभागाने यासाठी 1800118600 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.
वन आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, पूरस्थितीमुळे मानवासह सर्व सजीवांना धोका निर्माण झाला आहे. सतत पाण्यात राहिल्याने सापही अडचणीत आले असून ते स्वत:साठी सुरक्षित जागा शोधत आहेत. अशा स्थितीत ते घराघरांत शिरत आहेत. तसेच यमुनेच्या काठावर असलेल्या मदत शिबिराजवळ साप आढळल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. याबरोबरच रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वनमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' आवाहन
वन आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. स्वत:ला किंवा सापाला इजा पोहोचवण्याऐवजी जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सापाला वाचवा. हेल्पलाईनवर कॉल केल्यावर वन्यजीव विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचेल आणि सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडेल, असे त्यांनी सांगितले.
'संबंधित ठिकाणी तज्ज्ञ पाठवणार'
वनमंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, घरांमध्ये साप शिरल्याने सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. सापांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी वनविभागाने मोफत हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. हेल्पलाईनवरून केलेल्या तक्रारीवरून संबंधित ठिकाणी तज्ज्ञांना साप पकडण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाला रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही टीम दिल्लीतील सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम करेल. सर्व मदत छावण्यांभोवती विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :