Arvind kejriwal Test Corona Positive : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याचे आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
Arvind kejriwal Test Corona Positive : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत आहे. अशातच राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरुन त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी स्वत: घरातच विलगीकरणात असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये जे लोक संपर्कात आलेत त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. तसेच ज्यांना लक्षणे आहेत, अशांनी कोरोनाची चाचणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी डेहराडूनमध्ये सभा घेतली होती. त्यांनतर त्यांनी टेस्ट केली होती. एका दिवसानंतर आलेल्या अहवालात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अरविंद केजरीवाल यांचे मागील 5 दौरे
3 जानेवारीला अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंडचा एक दिवसीय दौरा करून डेहराडूनच्या परेड ग्राउंडवर जाहीर सभा घेतली.
2 जानेवारीला केजरीवाल लखनौमध्ये होते, तिथेही त्यांनी रॅली काढली होती.
1 जानेवारीला केजरीवाल हे अमृतसरच्या राम तीर्थ मंदिरात पोहोचले होते.
31 डिसेंबरला ते पंजाबमधील पटियाला शहरात शांतता मोर्चात सहभागी झाले होते.
30 डिसेंबरला त्यांनीचंदीगड महापालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भात विजयी पदयात्रा काढली होती. यामध्ये त्यांच्यासोबत पंजाबमधील सर्व बडे नेते आणि विजयी नगरसेवक होते.
गेल्या 24 तासांत राजधानीत 4 हजार 99 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. साडेसात महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण काल आढळले आहेत. गेल्या वर्षी 18 मे ला 4 हजार 482 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. सध्या दिल्लीत कोरोनाचे सक्रिय रुग्ण 10 हजार 986 आहेत. तर कंटेनमेंट झोनची संख्या 2 हजार 8 आहे. ओमायक्रॉनचा प्रभाव दिल्लीतही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांत दिल्लीत ओमिक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.