(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Air Force Plane Crash : बंगालच्या उपसागरात हवाई दलाच्या विमानाचे अवशेष सापडले; 7 वर्षांपूर्वी 29 जणांसह झाले होते बेपत्ता
Indian Air Force : चेन्नईच्या किनाऱ्यापासून 310 किमी अंतरावर असलेल्या समुद्रात हे अवशेष आढळले आहेत. AN-32 विमानाचे. छायाचित्रांची तपासणी केल्यानंतर ते AN-32 विमानाशी जुळणारे असल्याचे आढळून आले.
Indian Air Force Plane Crash : सुमारे साडेसात वर्षांपूर्वी 29 जणांसह बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या An-32 विमानाचे संभाव्य अवशेष बंगालच्या उपसागरात आढळून आले आहेत. बंगालच्या उपसागरात सुमारे 3.4 किमी खोलीवर या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.
'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने तैनात केलेल्या ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकलने (AUV) नुकत्याच घेतलेल्या छायाचित्रांच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. चेन्नईच्या किनाऱ्यापासून 310 किमी अंतरावर असलेल्या समुद्रात हे अवशेष आढळले आहेत. AN-32 विमानाचे. छायाचित्रांची तपासणी केल्यानंतर ते AN-32 विमानाशी जुळणारे असल्याचे आढळून आले.
AN-32 च्या अवशेषाकडे निर्देश : संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की त्या भागात इतर कोणत्याही बेपत्ता विमानाचे वृत्त अथवा माहिती नाही. त्यामुळे संभाव्य अपघातस्थळावरील हा शोध कदाचित अपघातग्रस्त IAF An-32 चे अवशेष असल्याचे दर्शवतो.
नोंदणी क्रमांक K-2743 असलेले भारतीय हवाई दलाचे An-32 विमान 22 जुलै 2016 रोजी एका मोहिमेदरम्यान बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झाले होते. विमानात 29 कर्मचारी होते. विमान बेपत्ता झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती, परंतु बेपत्ता कर्मचारी किंवा विमानाचा ढिगारा सापडला नव्हता.
अपघातग्रस्त विमानाचा राडरोडा कसा शोधला गेला?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे, अलीकडेच बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाच्या शेवटच्या ज्ञात ठिकाणी खोल-समुद्र शोध AUV तैनात केले आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मल्टी-बीम सोनार (साऊंड नेव्हिगेशन आणि रेंजिंग), सिंथेटिक ऍपर्चर सोनार आणि हाय रिझोल्यूशन फोटोग्राफीसह अनेक पेलोडचा वापर करून 3,400 मीटर खोलीवर हा शोध लावला गेला. मंत्रालयाने म्हटले आहे की सापडलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणात चेन्नई किनारपट्टीपासून सुमारे 140 नॉटिकल मैल (3.10 किमी) समुद्रतळावर अपघातग्रस्त विमानाचा ढिगारा असल्याचे सूचित केले आहे.
काय होती घटना?
बेपत्ता झालेले हवाई दलाच्या विमानाने चेन्नईच्या तांबरम हवाई दलाच्या स्थानकावरून सकाळी 8:30 वाजता उड्डाण घेतले आणि ते दुपारच्या सुमारास पोर्ट ब्लेअर येथे येणार होते. मात्र, सकाळी 9.12 वाजता चेन्नईपासून पूर्वेला 280 किलोमीटर अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला.
हवाई दलाच्या त्या विमानात 29 लोक होते. यामध्ये सहा क्रू सदस्य, 11 IAF कर्मचारी, दोन भारतीय सैन्य सैनिक, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलातील प्रत्येकी एक आणि नौदल शस्त्रागार डेपोमध्ये काम करणारे आठ कर्मचारी होते.
विमानाचा शोध आणि बचाव कार्य ही भारतातील सर्वात मोठी शोध मोहीम बनली. ज्यामध्ये भारतीय सैन्याच्या सैनिकांनी पाणबुडी, जहाजे आणि विमान शोधण्यासाठी अनेक विमानांचा वापर केला. 1 ऑगस्ट, 2016 रोजी, विमानात पाण्याखालील लोकेटर बीकन नसल्याची पुष्टी करण्यात आली होती, तर 15 सप्टेंबर 2016 रोजी बचाव मोहीम बंद करण्यात आली होती. बचाव मोहिम बंद करण्यात आल्यानंतर या विमानातील नागरिकांना मृत घोषित करण्यात आले.