देशातील महत्त्वाच्या संस्थावरील सायबर हल्ले सुरुच, ऑईल इंडिया हॅकर्सकडून लक्ष्य
Cyber Attacks on Oil India Limited Headquarter : हवामान विभाग, यूजीसी पाठोपाठ आता ऑईल इंडिया हॅकर्सकडून लक्ष्य.
Cyber Attacks on Oil India Limited Headquarter : गेल्या अनेक दिवसांपासून देशातील संस्थांवर सायबर हल्ले सुरूच आहेत. पण हे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. सरकारी मालकीच्या ऑईल इंडिया लिमिटेडच्या (Oil India Limited) आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील दुलियाजन येथील नोंदणीकृत मुख्यालयावर सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी कंपनीला कार्यालयातील सर्व संगणक आणि आयटी प्रणाली बंद करण्यास भाग पाडलं. कंपनीच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात मंगळवारी माहिती दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्त्वाच्या संस्थांवर सायबर हल्ल्यांचं सत्र सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी यूजीसी इंडियाचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. याशिवाय भारतीय हवामान खात्याच्या ट्विटर अकाऊंटवरही सायबर हल्ला झाला होता. हवामान खात्याचं ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचं ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आलं आहे. मात्र, हॅक केल्यानंतर काही वेळातच ट्विटर अकाउंट सुरक्षित करुन हॅकर्सच्या तावडीतून सोडवण्यात संस्थांना यश आलं होतं.
परंतु, या सर्व घटनांमध्ये आणखी एक भर म्हणजे, ऑईल इंडिया लिमिटेडच्या मुख्यालयावर सायबर झाला आहे. ऑईलचे प्रवक्ते त्रिदेव हजारिका यांनी म्हटलं की, सिस्टम सोमवारपासून बंद होती आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत होते. ते म्हणाले की, "सोमवारी जेव्हा आम्हाला समजलं की, तीन ते चार कम्प्युटरमध्ये एका व्हायरसचा बळी पडले होते. त्यामुळे आम्हाला आमचे सर्व संगणक LAN कनेक्शनमधून काढून टाकावे लागले."
ते पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यालयातील एकाही संगणकाला आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. हजारिका म्हणाले की, "आयटी विभाग नुकसान किती प्रमाणात झाले हे तपासत आहे. ऑईल इंडिया लिमिटेड ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे".
दरम्यान, ऑईल इंडियाबाबत बोलायचे झाले तर ऑईल इंडियावर झालेला हा पहिला सायबर हल्ला नाही. यापूर्वीही कंपनीमध्ये अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या. ते म्हणाले, "यापूर्वी देखील कंपनीला अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं, परंतु यावेळी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित एक गंभीर संकट आहे, ज्याचे निराकरण होण्यास वेळ लागेल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
UGC इंडियाचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक; हॅकर्सनी केले NFT ट्रेडिंग संदर्भात ट्वीट