CWC Meeting | पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर राहुल गांधी यांची कठोर शब्दात नाराजी, कपिल सिब्बल यांचं ट्विटरवर उत्तर
Congress Working Commitee Meeting | सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर राहुल गांधी यांनी कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. हे नेते भाजपसोबत एकप्रकारे हातमिळवणी करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. यावर कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर उत्तर दिलं. तर गुलाम नबी आझाद देखील भडकले
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर काँग्रेस खासदार राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. "इच्छा नसतानाही सोनिया गांधी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणं किती योग्य आहे?," अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी सवाल विचारले. या पत्रामुळे 23 नेते भाजपसोबत एकप्रकारे हातमिळवणी करत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी बोलत होते.
राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट ट्वीट करुनच त्यांना उत्तर दिलं. कपिल सिब्बल यांनी लिहिलं आहे की, "राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपला मदत करतोय. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मांडली. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. मागील तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केलं नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतोय!"
Rahul Gandhi says “ we are colluding with BJP “
Succeeded in Rajasthan High Court defending the Congress Party Defending party in Manipur to bring down BJP Govt. Last 30 years have never made a statement in favour of BJP on any issue Yet “ we are colluding with the BJP “! — Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020
तर दुसरीकडे भाजपशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देईन, असा पवित्रा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
राहुल गांधींनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही, दिशाभूल होऊ नका : रणदीप सिंह सुरजेवाला
दरम्यान कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला काँग्रसेचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मीडियातील चुकीच्या वृत्ताने आणि माहितीने दिशाभूल होऊ नका, असं सुरजेवाला म्हणाले. त्यांनी लिहिलं आहे की, "राहुल गांधी यांनी अशा आशयाचा कोणताही शब्द उच्चारला नाही किंवा संगनमत केल्याचंही म्हटलेलं नाही. मीडियात पसरलेल्या चुकीच्या वृत्त आणि माहितीने दिशाभूल होऊ नका. पण हो, एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा आणि दुखावण्यापेक्षा आपल्याला एकत्र येऊन मोदींच्या राजवटीविरुद्ध लढण्याचं काम केलं पाहिजे."Sh. Rahul Gandhi hasn’t said a word of this nature nor alluded to it. Pl don’t be mislead by false media discourse or misinformation being spread. But yes, we all need to work together in fighting the draconian Modi rule rather then fighting & hurting each other & the Congress. https://t.co/x6FvPpe7I1
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) August 24, 2020
पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांची भूमिका काय? या सगळ्या घडामोडींनंतर सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेतला तर चांगली गोष्ट, आता हंगामी अध्यक्ष आहे त्याऐवजी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली तरी पाठिंबा, राहुल गांधी यांनी स्वीकारली तरी पाठिंबा आहे," असं त्यांचं म्हणणं आहे.
सुनील केदार यांचा इशारा काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या पेचाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात मोकळेपणाने फिरु देणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. तसंच "काही विद्वानांनी आपलं मत मांडलं. पण माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. काँग्रेस पक्ष नेतृत्त्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी," असं सुनील केदार यांनी आज नागपुरात म्हटलं.
नव्या अध्यक्षाची निवड करा : सोनिया गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी . वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांची इच्छा असलेलं एक पत्र वाचून दाखवलं. त्यामध्ये सोनिया गांधी म्हणाल्या की, "मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नव्या अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु करावी."
संबंधित बातम्या
मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करुन नव्या अध्यक्षाची निवड करा : सोनिया गांधी
सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 23 नेत्यांची भूमिका समोर
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वर्किंग कमिटीच्या बैठकीत आज अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?