(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 23 नेत्यांची भूमिका समोर
काँग्रेसमधील 23 ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल सोनिया गांधींना पत्र लिहिलेल्या पत्रावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यातच आता या 23 नेत्यांची भूमिका समोर आली आहे. राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, अशी या नेत्यांची भूमिका आहे.
मुंबई : सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांची भूमिका समोर आली आहे. राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा, असं या नेत्यांचं म्हणणं आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहे. त्यातच पक्षातल्या 23 ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. ज्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं त्यात महाराष्ट्रातल्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण मिलिंद देवरा या तिघांचा समावेश होता. काँग्रेसला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा ही प्रमुख मागणी करत या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. पण काल संध्याकाळपासूनच काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरु झाली आहे.
पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांची भूमिका काय? या सगळ्या घडामोडींनंतर सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेतला तर चांगली गोष्ट, आता हंगामी अध्यक्ष आहे त्याऐवजी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली तरी पाठिंबा, राहुल गांधी यांनी स्वीकारली तरी पाठिंबा आहे," असं त्यांचं म्हणणं आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वर्किंग कमिटीच्या बैठकीत आज अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
सुनील केदार यांचा इशारा काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या पेचाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात मोकळेपणाने फिरु देणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. तसंच "काही विद्वानांनी आपलं मत मांडलं. पण माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. काँग्रेस पक्ष नेतृत्त्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी," असं सुनील केदार यांनी आज नागपुरात म्हटलं.
सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झालंय, नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान, सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहे. सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पुढच्या काही महिन्यात बिहार, बंगाल आणि नंतर यूपी, गुजरातच्या निवडणुका आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा हा पेच फार काळ प्रलंबित ठेवणं पक्षाला परवडणारं नाही. त्यात आता ज्येष्ठांच्या या पत्राचाही दबाव असल्याने आता अध्यक्षपदाबाबत आजच्या वर्किंग कमिटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.