Corona Vaccination: बड्या कार्पोरेट कंपन्या लस खरेदीच्या तयारीत, कर्मचाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे करणार लसीकरण
जगातील सर्वात मोठ्या कोरोनाच्या लसीकरणाचा (Corona Vaccination) भारतात शुभारंभ झाला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करण्यासाठी भारतातील बड्या कंपन्या ( India Inc) योजना तयार करत आहेत.
मुंबई: भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून त्यामध्ये कोरोना योध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील बड्या कार्पोरेट कंपन्यांही आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची योजना आखत असल्याचं समोर आलंय.
देशातील रिलायन्स, टाटा या कंपन्यांपासून वेदान्तापर्यंत आणि इतरही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळामध्ये कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची चर्चा सुरु केली आहे. त्यासाठी लस निर्मिती कंपन्यांकडून लसींच्या खरेदीचीही योजना तयार केली जात असल्याची चर्चा आहे.
देशात तयार होणाऱ्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या विक्रीचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. सरकारने लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योध्यांना प्राधान्य देण्याचं ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांपर्यंत ही लस पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे.
IN PICS | शुभारंभ! पाहा देशात कोणाकोणाला मिळाली कोरोना लस
खासगी कंपन्यांचेही नियोजन बड्या कार्पोरेट कंपन्यांनी आता थेट लस निर्माती कंपन्यांशी चर्चा करत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामाध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्याच्या नियोजनावर चर्चा केली जात आहे.
वेदान्ता रिसोर्सेजचे कार्यकारी अध्यक्ष अनिल अग्रवाल आपल्या एका ट्वीटमध्ये सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देताना म्हणाले की, "वेदान्ता समुहाचे सरकारच्या या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य असेल. लोकांना देण्यात येणारी ही लस आपल्या नागरिकांच्या भल्यासाठी आहे. एक जबाबदार कंपनीच्या भूमिकेतून वेदान्ता आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेल." वेदान्ताच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या लसीचे 25 हजार डोस खरेदी करण्याची योजना तयार करत आहे.
सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वातील JSW ग्रुपने आपल्या 55 हजार कर्मचाऱ्यांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यासाठी लस निर्मीती कंपन्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. या लस निर्मीती कंपन्यांना आपल्या लसींची विक्री खासगी बाजारात करण्याला अद्याप मान्यता नाही. केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीचे 1.1 डोस हे जवळपास प्रत्येकी 200 रुपयांना तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे 55 लाख डोस हे 295 रुपये प्रति डोस या किंमतीत खरेदी करत आहे. अशा परिस्थितीत भारतीय खासगी कंपन्यांना या लसीच्या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.
एका प्रमुख कंपनीच्या अधिकाऱ्याने एबीपी न्यूजला सांगितले की खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्यासाठी लस निर्मिती कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. त्यासाठी प्रत्येक डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्याचसोबत आता टाटा कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मजूमदार शॉ या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत COVID-19 लसीकरणाचे नियोजन करत असल्याची चर्चा आहे.
Corona Vaccination | 'जे घरी परतलेच नाहीत...' कोरोना योद्ध्यांचं बलिदान आठवताना मोदी भावूक