Coronavirus : देशातील कोरोनाचा आलेख वाढताच! दर तासाला 26 नवे कोरोनाबाधित, 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण
Covid-19 Update : भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
COVID-19 Outbreak : देशात (India Corona Update) पुन्हा एकदा कोरोना संक्रमण (Coronavirus) वाढताना दिसत असून यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे (Covid-19 JN.1 Variant) जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये (New Corona Patient) वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोविडच्या JN1 सब-व्हेरियंटचा कहर
चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोविडचा JN1 सब-व्हेरियंट वेगाने पसरत आहे. भारतात दर तासाला सुमारे 26 ते 27 कोरोना रुग्ण आढळत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे सर्वत्र नाताळ आणि नववर्षीची धूम पाहायला मिळत असताना वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 22 डिसेंबरला 24 तासांत 640 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,997 वर पोहोचली आहे. तर एका दिवसापूर्वी ही संख्या 2,669 होती.
नवीन JN.1 कोरोना व्हेरियंटने चिंता वाढवली
कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. JN.1 व्हेरियंटमुळे कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं मानलं जातं आहे. नवीन JN.1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंच आहे. JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट JN.1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे..
डॉक्टरांचा सल्ला काय?
AIIMS, दिल्ली येथील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे अतिरिक्त प्राध्यापक हर्षल आर साळवे यांनी सांगितलं आहे की, "कोविड -19 प्रकरणांच्या अहवालात सध्याची वाढ मुख्यतः ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराच्या JN.1 सब-व्हेरियंटमुळे आहे." नवीन सब-व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये नोंदवलेली लक्षणे बहुतेक वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गापुरती मर्यादित आहेत आणि आतापर्यंत या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत.
घाबरू नका, काळजी घ्या!
डॉक्टरांनी म्हटलं आहे की, घाबरण्याची गरज नाही. हिवाळ्याच्या मोसमात श्वसनाच्या विषाणूंच्या प्रसारात वाढ झाल्यामुळे देखील सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बहुतेक रुग्णांना सौम्य संसर्ग झाला आहे. सध्या, सुमारे 41 देशांमध्ये JN.1 व्हेरियंट आढळला आहे.
सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण कोविड-19 संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 4,50,07,212 इतकी आहे. यापैकी सध्या 2,997 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केरळमध्ये संसर्गामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,33,328 वर पोहोचली आहे. इतर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,44,70,887 झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.