Coronavirus : भारतात शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं गरजेचं; डॉ. अॅन्थनी फाऊची यांचा सल्ला
भारतात कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय योग्य असल्याचं डॉ. अॅन्थनी फाऊची (Dr. Anthony Fauci)यांनी सांगितलंय.
नवी दिल्ली : सरकारच्या NTAGI या समितीच्या शिफारसीनंतर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आलं आहे. अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगत त्याचं समर्थन केलं आहे. तसेच भारतात आता शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यात यावं असा सल्लाही त्यांनी दिलाय.
डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी न्यूज एजन्सी एएनआयला एक सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, "जर आपण अडचणीत असाल, जसा भारत आता आहे, त्या परिस्थितीत शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यावं. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्याचा निर्णय हा योग्यच आहे."
जर आपल्याकडे लसीच उपलब्ध नसतील त्यावेळी आपण या दोन डोसमधील अंतर वाढवू शकतो. त्यामुळे मधल्या काळात मोठ्या लोकसंख्येला लस देता येऊ शकते. पण जर लसी उपलब्ध असतील तर असं करु नये असंही डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी सांगितलं.
Extended gap between 2 doses of Covishield reasonable approach, India must get as many people vaccinated: Fauci
— ANI Digital (@ani_digital) May 14, 2021
Read @ANI Story | https://t.co/n1uxtIeRqk pic.twitter.com/fNASZsPpnE
सरकारी समितीने केलेल्या शिफारशी कोणत्या?
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या NTAGI समितीने काही शिफारसी केल्या होत्या. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये तीन ते चार महिन्याचं (12 ते 16 आठवडे) अंतर ठेवण्याची शिफारस सरकारच्या NTAGI समितीने केली होती. तर कोवॅक्सिनसाठी कोणताही बदल नाही. कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये पहिल्या सूचनेनुसार 28 दिवसांचं अंतर असेल. गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस ऐच्छिक आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणाऱ्या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात. कोविड-19 पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांनी बरं झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही NTAGI समितीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :