कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही; अमेरिकेचा दावा
कोरोनाचा हाच वाढता संसर्ग पाहता काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेलाही गती मिळाल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागला आहे. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 16 कोटी 17 लाख 23 हजारांच्याही पलीकडे पोहोचला आहे. कोरोनाचा हाच वाढता संसर्ग पाहता काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेलाही गती मिळाल्याचं दिसत आहे. यातच आता अमेरिकेतून अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. येथील डिसिस कंट्रोल अँड प्रिवेंशन सेंटरनं केलेल्या दाव्यानुसार कोरोना लसींचे डोस पूर्ण केलेल्या व्यक्ती या संसर्गापासून सुरक्षित आहेत.
लसीचे दोन डोस घेतल्यानंतर व्यक्ती सुरक्षित - CDC
जगभरात कोरोनामुळं मोठ्या प्रमाणात प्रभावित असणाऱ्या राष्ट्रांपैकी एक असणाऱ्या अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे की, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती मास्कचा वापर न करता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताही त्यांचं दैनंदिन आयुष्य जगू शकतात. कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर पाळण्यालाच प्राधान्य देण्यात येत आहे, अशातच अमेरिकेकडून करणात येणारा हा दावा पाहता अनेकांच्या भुवयाही उंचावत आहेत.
Pfizer : अमेरिकेत आता 12 ते 15 वयोगटातील बालकांना मिळणार Pfizer-BioNTech ची लस, US FDA ची मंजुरी
अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण
कोरोनाबाधित राष्ट्रांच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत इथं 3 कोटी 36 लाख 15 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 5 लाख 98 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्याच्या घडीला तब्बल 63 लाख 58 हजार रुग्णांवर कोरोनाचा उपचार सुरु आहे. आतापर्यंत अमेरिकेत 2 कोटी 66 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मातही केली आहे.