Coronavirus : दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृत्यूंची संख्या मात्र वाढली
Coronavirus Cases Today : देशात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत किचिंत घट झाली आहे. पण कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती जाणून घ्या.
Coronavirus Cases Today in India : भारतात गेल्या काही आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे. आता याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशातल मागील 24 तासांत 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 8 हजार 537 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.61 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के इतका झाला आहे.
भारतात रविवारी दिवसभरात 2 लाख 96 हजार 50 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत देशात एकूण 85.81 कोटीहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही नवी आकडेवारी जारी करत देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 20, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/ufFWbQokKr pic.twitter.com/U1nBV8yL3q
मुंबईत रविवारी 2087 नवीन कोरोनाबाधित
रविवारी दिवसभरात मुंबईत 2087 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 1802 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 61 हजार 164 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 583 झाली आहे. सध्या मुंबईत 13 हजार 613 रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात रविवारी 4004 रुग्णांची नोंद तर 3085 कोरोनामुक्त
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.86 टक्के इतकं झालं असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.84 टक्के इतका आहे. रविवारी राज्यात तब्बल 4004 रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 77,64,117 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.